पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी राज्यसभेतही आक्रमक पवित्रा घेत यूपीए सरकारच्या कामगिरीवर टीका करणारे विरोधी पक्ष, विशेषत: विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांना वस्तुनिष्ठ होण्याचा सल्ला दिला. यूपीएच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीविषयी मत्सर बाळगणारे विरोधक सरकारची निंदा करतात, असे प्रत्युत्तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी दिले.
या चर्चेदरम्यान यूपीए सरकारला झोडून काढताना रोमन इतिहासकार टॅसिटसला उद्धृत करणारे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांना मनमोहन सिंग यांनी टॅसिटसच्याच शब्दांत उत्तर दिले. ‘मत्सराने पेटून उठलेली माणसे चांगल्या-वाईटाची पारख न करता सर्वच गोष्टींची निंदा करतात,’ अशी जेटलींना कोपरखळी मारल्यावर पंतप्रधान त्यांची ‘स्तुती’ करायलाही विसरले नाहीत. विरोधी पक्षनेते सुज्ञ आणि अभ्यासू व्यक्ती आहेत. त्यांनी राजकीय कुरघोडीच्या नादी न लागता व्यापक राष्ट्रहितातून यूपीए सरकारचे मूल्यमापन करावे. आर्थिक विकासदर, कृषी आणि औद्योगिकीकरणाविषयी बोलताना जेटलींनी सरकारचे अधिक वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन करावे, असा टोला पंतप्रधानांनी लगावला.
‘‘अर्थव्यवस्थेतील नरमाईची स्थिती जास्त काळ टिकणार नाही आणि दोन-तीन वर्षांत भारताचा आर्थिक विकासदर पुन्हा आठ टक्क्यांवर पोहोचेल,’’ असे सांगून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपले सरकार सर्व उपाय करेल, असे पंतप्रधान म्हणाले. यूपीएच्या तुलनेत रालोआच्या शासनकाळात अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांत चांगल्या कामगिरीची नोंद झाल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. गेल्या नऊ वर्षांत देशाची प्रगती अधिक वेगाने झाली आहे. यूपीएच्या कार्यकाळात आरोग्य आणि शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात खर्च वाढल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. रालोआच्या काळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसारख्या बडय़ा शब्दांचा वापर करण्यात आला, पण या योजनांसाठी प्रत्यक्षात तरतूद नगण्यच होती. विरोधकांनी केलेले आरोप खोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी आकडेवारीचा आधार घेत रालोआ आणि यूपीएच्या कार्यकाळाची तुलना केली.
दहशतवादाबाबत सहमती अपेक्षित
दहशतवादावर सर्व राजकीय पक्ष एका स्वरात बोलतील आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात येत असलेल्या एनसीटीसीवर व्यापक सहमती होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानशी सुरळीत संबंध दहशतवाद संपेपर्यंत अशक्य
पाकिस्तानातून दहशतवादाला अद्यापही चालना देण्यात येत आहे. तेथील दहशतवाद जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर सुरळीत संबंध प्रस्थापित होणे शक्य नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी राज्यसभेत केले.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. ते म्हणाले, ‘दोन्ही देशांमधील सर्वसामान्यांच्या संपर्कात वाढ झाली आहे. व्यापारी संबंधही सुधारले आहेत. मात्र, जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादाला आळा घातला जात नाही, तोपर्यंत दोन देशांमधील संबंध सुरळीत होणे अशक्य आहे. गेली नऊ वर्षे आपल्या सरकारने हीच भूमिका घेतली आणि तीच यापुढेही कायम असेल.’
पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ हे भारताला उद्या, शनिवारी भेट देणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांनी भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. अश्रफ हे आपल्या एक दिवसाच्या भारत भेटीत अजमेरच्या मोईनुद्दीन चिस्ती दग्र्याला भेट देणार आहेत. त्यांच्या सन्मानार्थ जयपूर येथे भोजनाचे आयोजन परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी केले आहे.
पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारतीय जवानाचे शीर कापून नेल्याच्या प्रकारामुळे दोन्ही देशांमधील संबंध सध्या अधिक तणावपूर्ण बनले आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंगही वारंवार झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा