भारत आणि चीन यांच्यात उत्तम व्यापारी संबंध असल्याचे चीनचे म्हणणे असले तरीही हा व्यापार असमतोल आहे आणि म्हणूनच आम्हाला तो ‘हितकारक’ वाटत नाही, अशा शब्दांत भारतीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी चिनी पंतप्रधान ली केकियांग यांच्याकडे आपली ‘व्यापारविषयक चिंता’ व्यक्त केली. तसेच हा असमतोल कमी व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चीनला भारतात मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. त्यासाठी नवी दिल्लीत ‘चिनी औद्योगिक पार्क’ उभारण्यात यावे, अशी मागणी चीनचे पंतप्रधान केकियांग यांनी केली होती. चर्चेदरम्यान याविषयी बोलताना डॉ.मनमोहन सिंग यांनी ‘आपल्याही चीनकडून तशाच अपेक्षा असल्याचे’ सांगितले.
सध्या भारत आणि चीन यांच्यातील व्यापारी संबंध वाढीस लागलेले असले तरीही चीनकडून भारतास होणाऱ्या निर्यातीच्या तुलनेत चीनकडून मर्यादित प्रमाणातच भारतीय वस्तूंची आयात केली जाते. त्यामुळे उभयपक्षी व्यापारात एक असमतोल निर्माण झाला आहे आणि तो दूर होणे गरजेचे आहे, अशा शब्दांत भारतीय पंतप्रधानांनी चीनच्या प्रस्तावाबाबत आपले मत व्यक्त केले. भारताने चीनसह असलेल्या आर्थिक संबंधांत वृद्धी होण्याची तसेच हे संबंध समतोल होण्याची अपेक्षा व्यक्त केली असताना चीननेही या अपेक्षेस सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘द्विपक्षीय प्रादेशिक व्यापार तरतूद’ आणि ‘प्रादेशिक र्सवकष आर्थिक सहकार्य’ या करारांसही या संवादादरम्यान मूर्तस्वरूप देण्यात येईल, असे दोन्ही पंतप्रधानांनी निवेदनात म्हटले आहे.
भारताची मागणी : सध्या भारताकडून चीनला लोह खनिजासारख्या कच्च्या मालाची निर्यात होते. चीनने आपली बाजारपेठ कच्च्या मालाबरोबरच अन्य उत्पादनांसाठीही खुली करावी, अशी भारताची मागणी आहे. माहिती तंत्रज्ञान आणि औषधे या उद्योगांमध्ये भारत आघाडीवर असून त्यात भारताला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, अशी भारताची मागणी आहे.

‘स्टेपल व्हिसा’बाबत भारताचे आक्षेप
भारताच्या सीमेवर असणाऱ्या काही राज्यांमधील लोकांना चीनमध्ये येण्यासाठी चीनतर्फे देण्यात येणाऱ्या ‘स्टेपल व्हिसा’बाबत भारताने आपले आक्षेप नोंदविले. चीनने भारताच्या काही राज्यांमधील लोकांना वेगळ्या पद्धतीने आणि काही लोकांना स्टेपल पद्धतीने व्हिसा देणे थांबवावे, असा आग्रह पंतप्रधानांनी धरला. मात्र त्याचबरोबर चीनमधून भारतात येणाऱ्या पर्यटकांसाठी व्हिसा देण्याची पद्धत अधिक सोपी आणि सुटसुटीत केली जाईल, असे आश्वासनही डॉ. सिंग यांनी दिले.  
उभय देशांमध्ये या भेटीदरम्यान ‘व्हिसा’बाबतही करार होणे अपेक्षित होते, मात्र असा करार होऊ शकला नाही. अरुणाचल प्रदेशातील दोन महिला तिरंदाजांना चीनने स्टेपल व्हिसा वितरित केला होता. या घटनेमुळे ‘व्यथित’ झालेल्या भारताने यापुढील मैत्रीची पावले ‘मंदगतीने’ टाकण्याचे ठरविले आहे, असे भारतीय परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी स्पष्ट केले. चीनने व्हिसाबाबत कोणतेही आश्वासन भारताला दिले आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना सुजाता सिंग यांनी चर्चेच्या ‘अधिक तपशिलात’ जाण्यास नकार दिला. भारताने चीनकडे ‘पाक पुरस्कृत दहशतवादाचा’ तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील चिनी हालचालींचा विषयही काढला असल्याची माहिती सुजाता सिंग यांनी दिली.

हृद्य स्वागताने पंतप्रधान भारावले
भारतीय आणि चिनी पद्धतींचा संगम असलेले सुग्रास भोजन, बॉलीवूड आणि पाश्चिमात्य पद्धतीच्या सुरेल संगीताचे फ्युजन आणि स्वागतासाठी अंथरलेला ‘लाल गालिचा’ अशा अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात भारतीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे चीनमध्ये स्वागत करण्यात आले. सीमावर्ती भागातील चीनच्या वाढत्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या ‘तणावा’ची पाश्र्वभूमी भारतीय पंतप्रधानांच्या दौऱ्याला होती, मात्र स्वागतातूनच चीन मैत्रीसाठी उत्सुक असल्याचा संदेश देण्यात आला. चीन आणि भारत यांच्या पंतप्रधानांनी एकाच वर्षांमध्ये दोन वेळा भेटण्याची १९५४ नंतरची ही पहिलीच वेळ. या भेटीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग आणि चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी एकाच दिवशी भारतीय पंतप्रधानांसाठी भोजन आणि स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. तसेच चीनचे माजी पंतप्रधान वेन जिआबाओ यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांचे विशेष स्वागत केले. ५७ वर्षीय ली यांनी रात्रीच्या भोजनानंतर पंतप्रधानांसह बीजिंग शहरात काही वेळ फेरफटकाही मारला. कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांचे चिनी राष्ट्रप्रमुखांद्वारे करण्यात आलेले हे अनौपचारिक पद्धतीचे स्वागत ‘आंतरराष्ट्रीय राजकारणात’ अत्यंत दुर्मीळ मानले जाते.