पीटीआय, नवी दिल्ली
कृत्रिम प्रज्ञेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) नैतिक उपयोग करण्यात यावा. त्यासाठी जागतिक स्तरावर एकत्रितपणे उपाय शोधणे आवश्यक आहे. तसेच कूटचलनासंदर्भात (क्रिप्टोकरन्सी) एकात्मिक जागतिक धोरण निश्चित गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’तर्फे (सीआयआय) आयोजित ‘बी-२० समिट इंडिया-२०२३’ परिषदेत मोदी बोलत होते. आंतरराष्ट्रीय ग्राहक सेवा दिन साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातील पूर्वग्रह आणि समाजावर होणाऱ्या त्यांच्या दुष्परिणामांविषयी मोदी यांनी चिंता व्यक्त केली. ‘जी-२०’ राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेच्या काही दिवस आधी, पंतप्रधानांनी कूटचलनाशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन विकसित करण्याचा आग्रह धरला आहे.
हेही वाचा >>>चांद्रयान-३ कडून तापमानाचा पहिला संदेश ; ‘इस्रो’कडून फरकाचा आलेख प्रसिद्ध
मोदी म्हणाले, ‘कूटचलन (क्रिप्टोकरन्सी) हे एक आव्हान असून, ते हाताळण्यासाठी अधिक एकजुटीची गरज आहे. या संदर्भात सर्व संबंधितांच्या हीत रक्षणासाठी एक जागतिक आराखडा तयार केला पाहिजे. कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) संदर्भातही असाच दृष्टिकोन आवश्यक आहे. आज जग ‘एआय’बद्दल खूप उत्साह दाखवत आहे. परंतु या संदर्भात काही नैतिक बाबीही आहेत. त्याच्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त होत आहे. या समस्याही सोडवल्या गेल्या पाहिजेत.’’ मोदींनी यावेळी उद्योग आणि सरकारने ‘एआय’चा नैतिक वापर निश्चित करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की विविध क्षेत्रांत निर्माण होणारी आव्हाने-अडथळय़ांना आपण समजून घेतले पाहिजे. ही समस्या जागतिक स्तरावर सोडवावी लागेल.
‘कार्बन क्रेडिट ट्रेडिंग’ची सध्याची प्रथा सोडून ‘ग्रीन क्रेडिट’ स्वीकारण्याबद्दल मोदी म्हणाले की भारत ‘ग्रीन क्रेडिट’साठी जागतिक स्तरावर उपयोगी ठरेल, असा आराखडा तयार करत आहे. प्रभावशाली उद्योजकांनी पृथ्वीला-पर्यावरणाला अनुकूल व्यवसाय आणि जीवनशैली अंगीकारली पाहिजे. हवामान बदल, ऊर्जा क्षेत्रातील संकट, अन्न पुरवठा साखळीतील असमतोल, पाणी सुरक्षा या मुद्दय़ांचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, अशा बाबींचा व्यवसायांवर मोठा परिणाम होतो. ही आव्हाने दूर करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
हेही वाचा >>>“दिल्ली बनेगा खलिस्तान”, मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर लिहिल्या घोषणा; सुरक्षा यंत्रणा सक्रिय
मौल्यवान पदार्थ आणि दुर्मिळ धातू असमान प्रमाणात उपलब्ध असल्याबद्दल चिंता व्यक्त करून मोदी म्हणाले, त्यांची गरज सर्वच देशांना आहे. मात्र, ज्यांच्याकडे हे स्रोत आहेत त्यांनी त्याकडे आपली जागतिक जबाबदारी म्हणून पहावे. अन्यथा वसाहतवादाचे नवे प्रारूप निर्माण होईल. इतर देशांना केवळ बाजारपेठ मानून चालणार नाही. त्यामुळे शेवटी उत्पादक देशांचेही नुकसान होईल. या प्रगतीत सर्वाना समान भागीदार करणे हाच आगामी मार्ग असू शकतो. उद्योगांना अधिक ग्राहककेंद्रित करण्याचे आवाहन मोदींनी केले. उत्पादक आणि ग्राहकांच्या हितसंबंधांत समतोल असेल तरच फायदेशीर बाजारपेठ टिकू शकते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
उद्योजकांना आवाहन
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उद्योगांना आपल्या पारंपरिक दृष्टिकोनाबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन करताना ब्रँड आणि विक्रीच्या पलीकडे विचार करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की व्यवसाय म्हणून आपल्याला दीर्घकाळ लाभ देणारी व्यवस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. व्यवसायांनी जास्तीत जास्त नागरिकांची क्रयशक्ती सुधारण्यावर अधिक भर दिला पाहिजे. स्वार्थी दृष्टिकोनाने सर्व संबंधितांचे नुकसान संभवते.