पीटीआय, गांधीनगर
‘‘जागतिक स्तरावर सध्या अनेक प्रकारची अस्थिरता-अनिश्चितता असताना, भारत ‘आशेचा एक नवीन किरण’ म्हणून उदयास आला आहे. जग भारताकडे स्थैर्यासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ, एक विश्वासू मित्र, विकासवृद्धीचा स्रोत आणि एक महत्त्वाची जागतिक अर्थव्यवस्था म्हणून पाहत आहे. झपाटय़ाने बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत ‘विश्वमित्र’ म्हणून वाटचाल करत आहे,’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.
‘व्हायब्रंट गुजरात’ जागतिक परिषदेच्या दहाव्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी मोदी बोलत होते. संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जगातील अग्रगण्य कंपन्यांचे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अनेक देशांचे राष्ट्रप्रमुखही या परिषदेत सहभागी होत आहेत.
हेही वाचा >>>उस्ताद राशिद खान ‘सुपूर्द-ए-खाक’, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; हजारो चाहत्यांकडून श्रद्धांजली
मोदी म्हणाले, की मानांकन निश्चित करणाऱ्या सर्व प्रमुख संस्थांचे मत आहे, की आगामी काही वर्षांतच भारत जगातील तीन सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. लोककेंद्रित विकासावर विश्वास ठेवणारा भारत एक विश्वासू मित्र असून, जागतिक कल्याणावर विश्वास ठेवणारा भारत ‘ग्लोबल साऊथ’चा आश्वासक आवाज आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढीचे इंजिन, समस्यांवर उपाय शोधणारे तंत्रज्ञान केंद्र आणि प्रतिभावान तरुणांचे ऊर्जा केंद्र (पॉवरहाऊस) म्हणून जग भारताकडे पाहत आहे.
भारताच्या १४० कोटी जनतेचा प्राधान्यक्रम आणि आकांक्षा, त्यांचा मानवकेंद्रित विकासावरील विश्वास आणि सर्वसमावेशकता आणि समानतेबाबत आमची कटिबद्धता आहे, असे सांगून मोदी म्हणाले, की जागतिक समृद्धी आणि जागतिक विकासाचा हाच मुख्य पाया आहे. भारताचे प्राधान्यक्रम स्पष्ट आहेत. शाश्वत उद्योग, पायाभूत सुविधा आणि उत्पादन, नव्या युगातील कौशल्ये, भविष्यातील तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोपक्रम, हरित हायड्रोजन, पुनर्वापरयोग्य ऊर्जा, सेमीकंडक्टर्स आणि संबंधित तंत्रज्ञानास भारत प्राधान्य देत आहे.मोदी म्हणाले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था मजबूत आणि गतिमान असण्यामागे गेल्या दशकात आम्ही राबवलेल्या संरचनात्मक सुधारणा हे प्रमुख कारण आहे. ‘जी-२०’ राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदी असतानाही भारताने जागतिक भविष्यासाठी एक चौकट आखून दिली.