लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन उग्र झाले असताना, शुक्रवारी हरियाणामधील रेवाडी येथील जाहीर कार्यक्रमात, ‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवत आहे’, असे सांगत आंदोलक शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसप्रणित ‘यूपीए’ सरकारवर शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप मोदींनी केला. काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा योजना घोषित केली पण, त्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता आला नाही. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी काँग्रेसच्या सरकारने हमी दिली नाही. पण, केंद्रात आमचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना केवळ बँकेचे कर्ज मिळवून दिले नाही तर आम्ही हमीही दिली, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>काँग्रेसची बँक खाती गोठवली; प्राप्तिकर विभागाची कारवाई, लवादात धाव घेतल्यानंतर दिलासा

किमान आधारभूत किमतीसंदर्भात कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब व हरियाणातील शेतकरी आंदोलन करत असून त्यासंदर्भात मोदींनी जाहीरपणे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र, हरियाणातील कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अप्रत्यक्ष दखल घेतली. केंद्र सरकारने छोटय़ा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी किसान सन्मान निधीसारख्या योजना राबवल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

आंदोलक शेतकरी नेते व तीन केंद्रीय मंत्री यांच्यामध्ये गुरुवारी पाच तास झालेली चर्चाही निष्फळ ठरली. आत्तापर्यंत तोडगा काढण्यासाठी तीन बैठका झाल्या आहेत. शेतकरी नेत्यांनी अनेक सूचना केल्या असून चर्चा सकारात्मक झाली, असे केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी पत्रकारांना सांगितले. हमीभावाच्या मागणीवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन चालू राहील, असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>‘काही निधर्मी वगळता गेल्या १० वर्षांत अनेक भारतीय जातीयवादी झाले’, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे विधान

दरम्यान, शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून शुक्रवारीही आंदोलनांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठय़ा प्रमाणावर अश्रुधुरांचा मारा केला. तरीही पोलिसांच्या कारवाईला न जुमानता शेतकऱ्याचा ठिय्या कायम आहे. शेतकरी संघटनांनी शुक्रवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. त्यामुळे प्रामुख्याने पंजाबमध्ये काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. शंभू सीमा तसेच, हरियाणातील विविध ठिकाणी तसेच दिल्लीच्या वेशींवरही पोलीस व निमलष्करी दलांचा कडेकोट बंदोबस्त असून राजधानी परिक्षेत्रामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Story img Loader