Monkey Rescued From PM Modi House: राजधानी दिल्ली शहारात जूनच्या दुसऱ्या आठवड्यातही सूर्यदेव आग ओकत आहे. रेकॉर्ड ब्रेकिंग अशी उष्णतेची लाट दिल्लीवासियांच्या जीवाची लाही लाही करतेय. उष्णतेमुळे यंदा आतापर्यंत अनेक मृत्यूच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. हीटस्ट्रोकमुळे अनेक रुग्ण रुग्णालयात देखील दाखल झाले आहेत. बुधवारी तर दिल्लीतील उष्णतेचा पार ४८ डिग्रीपर्यंत पोहोचला होता. या भीषण उन्हाळ्यात माणूस तरी त्यातल्या त्यात आपल्या घरी- ऑफिसमध्ये सुरक्षित राहू शकतो पण मुक्या जीवाचे होणारे हाल हे अत्यंत गंभीर आहेत. अशाच एका उष्णतेने आजारी पडलेल्या माकडाची अलीकडेच पंतप्रधान मोदींच्या घराच्या आवारातून सुटका करण्यात आल्याचे समजतेय.

माकडाची सुटका कशी झाली?

वन्यजीव एसओएस रॅपिड रिस्पॉन्स युनिटने दिल्लीतील लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानातून एका वर्षाच्या नर माकडाची सुटका केली आहे. या माकडावर सध्या उपचार चालू असल्याचे बुधवारी एका निवेदनात सांगण्यात आले. सदर माकडाला उष्माघात आणि हायपरथर्मियाचा त्रास होता, तो अत्यंत थकलेला, निर्जलित दिसत असून तो चालण्यास सुद्धा सक्षम नव्हता, त्याचे फक्त श्वासोच्छवास चालू असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी लगेचच त्याची सुटका करून उपचार सुरु केले.

निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा एनजीओला कॉल आला तेव्हा त्यांनी माकडाच्या बचावासाठी रॅपिड रिस्पॉन्स युनिट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे पाठवले. पशुवैद्यकीय पथकाने माकडाच्या स्थितीचे मूल्यांकन करून गंभीर निर्जलीकरण आणि हायपरथर्मियाची पुष्टी केली. टीमने माकडाची आरोग्य स्थिती स्थिर करण्यासाठी इंट्राव्हेनस फ्लुइड्स, मल्टीविटामिन फ्लुइड थेरपी आणि ओरल रीहायड्रेशन सॉल्ट (ओआरएस) दिले. सध्या या माकडाच्या तब्येतीला लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. तो पूर्णपणे बरा होऊ शकतो असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे, सध्या त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

वाइल्डलाइफ एसओएसचे सह-संस्थापक आणि सीईओ कार्तिक सत्यनारायण यांनी सांगितले की, “उष्माघाताच्या प्रकरणांमध्ये, प्राण्याचे आरोग्य आणि जगण्याची खात्री करण्यासाठी प्रतिबंधात्मक जलद गतीने केले जाणे आवश्यक आहे.” तर, वाइल्डलाइफ एसओएसचे विशेष प्रकल्प संचालक वसीम अक्रम यांनी माकडाच्या उपचारासाठी वन्यजीव एसओएसशी संपर्क साधणाऱ्या पंतप्रधानांच्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या जलद कारवाईचे कौतुक केले आहे.

हे ही वाचा<< Reasi Attack: पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीची वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवरील हल्ल्याविरुद्ध पोस्ट; भारतीयांनी केलं कौतुक

दुसरीकडे, दिल्लीतील तापमानाविषयी सांगायचे झाल्यास येत्या १८ जून पर्यंत तरी दिल्लीतील रहिवाश्यांना उष्णतेपासून सुटका मिळण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात व दक्षिणेकडील राज्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावल्याने आनंदी वातावरण पाहायला मिळतेय.