अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण, ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कुस्तीगीर आंदोलन करत आहे. आज ( ३० एप्रिल ) कुस्तीगिर बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधत न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
बजरंग पुनियाने सांगितलं की, “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरू राहणार आहे. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. पण, कुस्ती महासंघाचे काही लोक या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचं काम करत आहेत.”
हेही वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील एकमेव अद्भूत नेते ज्यांनी…” अमृता फडणवीसांच्या पोस्टने वेधलं लक्ष
‘एक कुटुंब आणि आखाडा माझ्याविरोधात आहे’, असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं होतं. यालाही बजरंग पुनियाने प्रत्युत्तर दिलं आहे. “हा कुटुंबाचा विषय नाही आहे. कुटुंबवाद हा त्यांच्याकडेच होत असून, आरोप आमच्यावर करण्यात येत आहे. कोणत्याही कुस्तीगिराचा इतिहास गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही आहे. पण, ब्रिजभूषण सिंह यांचाच इतिहास गुन्हेगारीचा आहे,” असं बजरंग पुनियाने सांगितलं.
“आमची लढाई निवडणुकीसाठी नाही आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी असं कोणतं मोठं काम केलं, की त्यांना हार घातले जात आहेत. भारतात त्यांच्याएवढा मोठा गुन्हेगार कोण नाही आहे,” अशी टीका बजरंग पुनियाने ब्रिजभूषण सिंह यांच्यावर केली आहे.
हेही वाचा : काँग्रेसच्या ‘४० टक्के कमिशन’च्या आरोपांना पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर; म्हणाले, “शाही कुटुंब…”
विनेश फोगाट म्हणाली की, “न्यायालयीन प्रकरणावर काही बोलणार नाही. मात्र, अनेक राज्यातील खेळाडूंचं आम्हाला समर्थन मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या ‘मन की बात’ ऐकावी. करोडो लोक आमचं समर्थन करत आहेत, हीच आमची ताकद आहे.”