नवी दिल्ली : ‘मायबाप सरकार’ हे प्रारूप आता कालबाह्य झाले आहे. लोकांना नागरी सुविधांसाठी सरकारकडे येण्याची गरज नाही, सरकारच लाभार्थींपर्यंत पोहोचू लागले आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या सलग ११व्या भाषणात पंतप्रधानांनी सरकारी संस्थांच्या सुधारणांवर प्रामुख्याने भर दिला.
पंतप्रधान म्हणाले, की लोकशाही व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदेपर्यंत ३ लाख संस्था आहेत. प्रत्येक संस्थेने वर्षभरात लोकांना चांगली सेवा देण्याच्या हेतूने किमान २ सुधारणा केल्या, तरी पाच वर्षांमध्ये ३० लाख सुधारणा होतील. देशात येत असलेल्या मोठ्या परदेशी गुंतवणुकीला आकृष्ट करण्यासाठी राज्या-राज्यांमध्ये स्पर्धा झाली पाहिजे. राज्य सरकारांनी गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे, कायदा-सुरक्षेची स्थिती सुधारली पाहिजे, असा मुद्दाही मोदींनी मांडला. ‘एनडीए’ सरकार प्रामाणिकपणे लोकांची सेवा करत आहेत. भारत जसजसा विकसित होईल, त्याचा जगभरात दबदबा वाढेल तशी देशांतर्गत व देशाबाहेरील आव्हाने वाढतील, त्यांना सामोरे जावे लागेल. पण, भारत युद्धखोर नाही, जगाला युद्धाच्या खाईत ढकलून देण्याची भारताची प्रवृत्ती नाही. भारतापासून जगाला कोणताही धोका नाही. उलट, भारत विश्वाच्या कल्याणासाठी कार्यरत राहिला आहे, या देशाचा इतिहास, संस्कृती जगाने समजून घेतली पाहिजे, असे सांगत मोदींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. तिथले अल्पसंख्य सुरक्षित राहिले पाहिजेत. शेजारील राष्ट्रांतील शांतता-सुरक्षा आणि विकासासाठी भारत कटिबद्ध असल्याचा मोदींनी पुनरुच्चार केला.
ममता सरकारवर टीका
कोलकाता येथील शिकाऊ महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व हत्येच्या घटनेच्या संदर्भात मोदींनी तृणमूल काँग्रेस सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. महिलांवरील अत्याचाराविरोधात जनतेमध्ये आक्रोश असून या घटनांकडे राज्य सरकारांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे.
हेही वाचा >>>Rape On Nurse : घरी परतणाऱ्या नर्सवर बलात्कार आणि त्यानंतर केली हत्या, एकाला अटक
भ्रष्टाचारावर भाष्य
‘आपण भ्रष्ट शासनावर मात केली असून भ्रष्टाचाराविरोधातील लढा चालूच राहील. त्यामुळेच माझ्यावर वैयक्तिक हल्लाबोल केला जात आहे. पण, मी देशाच्या हिताला प्राधान्य देतो. भ्रष्टाचाऱ्यांच्या मनात भय निर्माण केले जाईल. सामान्यांना फसवण्याचे ते धाडस करू शकणार नाहीत’, अशी हमी पंतप्रधानांनी दिली. देशाची जनता अल्पसंतुष्ट नसून नवनवे संकल्प पूर्ण करण्याचा त्यांचा उपजत स्वभाव आहे. पण, काही मूठभर लोक निराशा पसरवत आहेत, असे मोदी म्हणाले.
सरकारकडे अनेक सूचना आल्या आहेत. शासन-प्रशासन, न्यायव्यवस्था अशा अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत, असे लोकांनी कळवले आहे. सामान्य लोकांच्या जगण्यामध्ये दर्जात्मक बदल होणे व त्यांचे जीवनमान सुधारण्याचा सरकारचा उद्देश आहे. – नरेंद्र मोदी</strong>, पंतप्रधान