स्वदेशी बनावटीच्या लसींमुळे भारताने लसीकरण मोहिमेत वेग घेतला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. जनतेला संबोधून बोलत असताना पंतप्रधानांनी देशाच्या लसीकरणासंदर्भातल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्याचवेळी मोदींनी पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यातला फरकही दाखवून दिला आहे.

आज जनतेला संबोधून बोलत असताना पंतप्रधान म्हणाले, “सध्या देशात आपण भारतीय बनावटीच्या दोन लसी तयार केल्या. जर त्या केल्या नसत्या तर काय झालं असतं याचा विचार करा. आत्ता जर आधीसारखी परिस्थिती असती तर संपूर्ण देशाचं लसीकरण करण्यासाठी ४० वर्षे लागली असती.”

आणखी वाचा- Corona Vaccine: लस मिळायला का उशीर होतोय? मोदींनी सांगितलं कारण…

देशातल्या लसीकरण मोहिमेवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, “भारतात जर लसींची निर्मिती झाली नसती तर विचार करा काय झालं असतं…एवढ्या मोठ्या संख्येला आपण लस कशी देऊ शकलो असतो? पोलिओ, कांजिण्या अशा साथींच्या लसी विदेशातून भारतात यायला दशकं लागली होती. पण भारताने एकाच वर्षात दोन लसींची निर्मिती केली आहे.”

त्यांनी देशातल्या वैज्ञानिकांचं आणि शास्त्रज्ञांचं कौतुकही केलं. “आपल्या देशातले शास्त्रज्ञ, लस निर्मिती कंपन्या बड्या देशांच्या तोडीस तोड काम करत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत २३ कोटी देशवासियांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.लस निर्मितीसाठी सरकारनं अर्थसाहाय्य केलं आहे. त्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले, भारतात लस उत्पादक कंपन्यांना सरकारनं संशोधनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यापासून सगळी मदत केली आहे. या कंपन्यांना हजारो कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे”,असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- देशातील १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार; मोदींची मोठी घोषणा

“लसींच्या आगामी काळातल्या पुरवठ्याबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केलं आहे. देशात सध्या सात कंपन्या करोना प्रतिबंधक लसीचं उत्पादन करत आहेत. तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत. दुसऱ्या देशांशी पण लसींच्या पुरवठ्याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होणार आहे”, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे.

Story img Loader