पीटीआय, वॉशिंग्टन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी गुरुवारी येथे आगमन झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ते भेट घेऊन चर्चा करतील. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर खात्याच्या संचालक तुलसी गॅबार्ड आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी झालेल्या चर्चेत द्विपक्षीय सहकार्यावर भर देण्यात आला.
अमेरिकी अध्यक्षांच्या ‘ब्लेअर हाउस’ या अतिथी निवासामध्ये मोदी राहणार आहेत. पंतप्रधान मोदींचे भारतीय समुदायाने मोठे स्वागत केले. अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर खात्याचे संचालक तुलसी गॅबार्ड यांची पंतप्रधानांनी भेट घेतली. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीसंबंधांवर त्यांच्याशी चर्चा केली. गॅबार्ड यांचे नव्या नियुक्तीबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केले.
भारत-अमेरिका मैत्रीसाठी गॅबार्ड यांनी कटिबद्धता व्यक्त केली, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले. दहशतवादविरोध, सायबर सुरक्षा आणि इतर नवे धोके यांत अमेरिकी गुप्तचर खात्याबरोबर सहकार्य वाढविण्यावरही चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ‘एक्स’वर दिली.
मोदी-एनएसए चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मायकल वॉल्ट्ज यांची भेट घेतली. वॉल्ट्ज यांच्याशी ही पंतप्रधानांची पहिलीच भेट होती. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालदेखील उपस्थित होते.