पीटीआय, लेपचा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक सद्य:स्थितीत भारताकडून अपेक्षा वाढत असताना, शांतता राखण्यात आणि भारताच्या सीमा सुरक्षित राखण्यात सुरक्षा दलांची मोठी भूमिका आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे केले. सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची दरवर्षीची परंपरा पंतप्रधानांनी याही वर्षी कायम राखली. भारत संरक्षण क्षेत्रात ‘मोठा जागतिक खेळाडू’ म्हणून उदयाला येत असून, त्याच्या सुरक्षा दलांच्या क्षमता सतत वाढत आहेत. जगातील सद्य:स्थिती अशी आहे, की भारताकडून असलेल्या अपेक्षा सतत वाढत आहेत, असे सैनिकांना संबोधित करताना मोदी यांनी सांगितले.

‘अशा महत्त्वाच्या वेळी भारताच्या सीमा संरक्षित असणे व देशात शांततेचे वातावरण असणे आवश्यक आहे आणि तुमची त्यात मोठी भूमिका आहे’, असे भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) गणवेषात असेलेले मोदी म्हणाले. ‘माझे बहाद्दर सैनिक सीमेवर हिमालयासारखे निर्भयपणे उभे असेपर्यंत भारत संरक्षित आहे. स्वातंत्र्यानंतर आमच्या बहाद्दर जवानांनी अनेक युद्धे लढली आणि देशाचे हृदय जिंकले. आमच्या जवानांनी आव्हानांचा सामना करत विजय खेचून आणला आहे’, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.

हेही वाचा >>>ऐन दिवाळीत गुजरातमध्ये ७१ कैद्यांची सुटका, कारण सांगत गृहमंत्री म्हणाले, “केंद्र सरकारने…”

 ‘जेथे परिवार आहे तेथे पर्व आहे असे म्हटले जाते. सणांच्या दिवशी कुटुंबापासून दूर राहाणे आणि सीमेवर तैनात असणे कर्तव्याबाबतच्या बांधिलकीचे उदाहरण घालून देते. हा देश तुमचा ऋणी आहे’, असेही पंतप्रधान अभिमानाने म्हणाले. ‘यामुळे, दिवाळीत एक दिवा तुमच्या सुरक्षिततेसाठी असून, प्रत्येक प्रार्थनेत लोक तुमच्या सुरक्षिततेची कामना करतात’, असेही त्यांनी सांगितले.‘गेल्या ३०-३५ वर्षांपासून, एकही दिवाळी मी तुमच्याशिवाय साजरी केलेली नाही. मी पंतप्रधान नव्हतो, किंवा मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही मी तुमच्यासोबत सीमेवर दिवाळी साजरी केली’, असे मोदी म्हणाले.

भारताच्या सैनिकांनी जीव धोक्यात घालून नेहमी पुढेच वाटचाल केली आहे आणि सीमेवरील ‘सर्वात मजबूत भिंत’ असल्याचे सिद्ध केले आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi asserted that india is safe as long as there are brave soldiers on the border amy