मुंबई : जगात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू असून सागरी व्यापाराचा त्यात मोठा वाटा राहणार आहे. बंदरे, जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. पुढील काळात सागरी व्यापार क्षेत्रातही आघाडीचा देश म्हणून भारताचे नाव घेतले जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.मोदी यांच्या हस्ते तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेचे आणि सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन, कोनशिला अनावरण उपक्रमांचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले. ही तीन दिवसांची परिषद वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर सुरू आहे.राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय बंदर व जलवाहतूकमंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्याचे बंदरे मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.
गेल्या ९ वर्षांपासून सागरी व्यापार आणि प्रवासी धोरण सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपला व्यवसायभिमुख सुविधा निर्देशांक (लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स) खूप सुधारला आहे. भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही युद्धनौका देशाच्या सामर्थ्यांचे प्रतीक आहे. जहाज बांधणी क्षेत्रातही आपण देशाला लवकरच आघाडीवर नेऊ, यात शंका नाही.
हेही वाचा >>>Israel-Hamas War: गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायली तरुणीचा ‘तो’ VIDEO हमासकडून जारी
पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की, मुंबईत २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरू होणार असून तेथे वार्षिक २०० क्रूझ जहाजे आणि एक दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल. महाराष्ट्र विकासात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. खासगी बंदरांसाठी रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधा विकसित करण्याबरोबरच सागरी पर्यटन, जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर उद्योगांना महत्त्वपूर्ण चालना देण्यात येत आहे.
या वेळी मुंबई पोर्ट ट्रस्टला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्धल एका टपाल तिकिटाचे आणि प्रोपेलिंग इंडियाच्या ‘मेरिटाइम व्हिजन’ या पुस्तकाचे राज्यपाल बैस, मुख्यमंत्री शिंदे व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
गुंतवणूकदारांना सर्वतोपरी सहकार्य -बनसोडे
महाराष्ट्रात उद्योगांसाठी अतिशय चांगले वातावरण असून सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आवश्यक ते सहकार्य व पाठबळ राज्य शासन देत आहे. सरकारने महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र सागरी विकास धोरण-२०२३ जाहीर केले आहे, असे प्रतिपादन बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी या वेळी केले. आजही मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर ही दोन प्रमुख बंदरे मोठे योगदान देत आहेत. याशिवाय जेएसडब्लू जयगड, आंग्रे, दिघी, कारंजा टर्मिनल बंदरेही चांगली प्रगती करीत आहेत.
२३ हजार कोटीं रुपयांहून अधिक प्रकल्प
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘अमृत काल व्हिजन २०४७’ चे अनावरण करण्यात आले. या वेळी मोदी यांच्या हस्ते २३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली. गुजरातमधील दीनदयाळ बंदर प्राधिकरण येथे चार हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या टुना टेक्रा ऑल-वेदर डीप ड्राफ्ट टर्मिनलच्या कोनशिलेचे अनावरणही करण्यात आले. या वेळी सागरी क्षेत्रात जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारीसंदर्भात सात लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे ३०० हून अधिक सामंजस्य करारही करण्यात आले.