पीटीआय, अयोध्या
विकास आणि वारसा यांची शक्ती देशाला पुढे नेऊ शकते. विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचायचे असेल, तर वारसा जतन करावाच लागेल. तीच आपली प्रेरणा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.
पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील पुनर्विकसीत रेल्वे स्थानक आणि महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर जाहीर सभेत भाषण केले. ते म्हणाले,‘‘जगातील कोणत्याही देशाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचायचे असेल, तर त्याला आपला वारसा जतन करावा लागेल. कारण वारसाच आपल्याला प्रेरणा देतो, आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. म्हणूनच आजचा भारत प्राचीन आणि आधुनिक अशा दोन्ही गोष्टी आत्मसात करून पुढे जात आहे.’’ राम मंदिराच्या निमित्ताने आता दररोज संपूर्ण देश आणि जगभरातून लोक अयोध्येला येतील. लोकांचे अयोधेला भेट देणे अनंतकाळापर्यंत चालू राहील, असेही ते म्हणाले. अयोध्या शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर करण्याचा संकल्प करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा >>>पोटनिवडणुकीतील उमेदवाराला मंत्रिपद आचारसंहितेचे उल्लंघन, काँग्रेसचा आरोप
‘२२ जानेवारीची आतुरता’
एक काळ असा होता जेव्हा रामलल्ला अयोध्येत तंबूत राहात होते, आज केवळ रामलल्लाच नाही तर देशातील चार कोटी गरिबांना कायमस्वरूपी पक्के घर मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण जग २२ जानेवारीच्या अयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अयोध्येतील लोकांमधील हा जल्लोष आणि उत्साह अतिशय स्वाभाविक आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक या वेळी उपस्थित होते.
विकास प्रकल्पांचे उद्घाटन, भूमीपूजन
पंतप्रधानांच्या हस्ते केंद्र आणि राज्य सरकारच्या १५,७०० कोटींच्या ४६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात आले. त्यानिमित्त रामायणाशी निगडीत आणि रामजन्मभूमी आंदोलनापासून आधुनिक काळातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेली अयोध्या नगरी फुलांनी सजवण्यात आली होती.
हेही वाचा >>>पंधरा हजार कोटींची विकासकामे;पंतप्रधानांच्या अयोध्या दौऱ्यात विकासकामांचे लोकार्पण
भारतीय रेल्वेची ‘त्रिशक्ती’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत रेल्वे गाडय़ांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यानिमित्त ते म्हणाले, की वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत ही त्रिशक्ती भारतीय रेल्वेचा कायापालट घडवणार आहे.
२२ जानेवारीला दीपावली साजरी करा
२२ जानेवारी हा विशेष दिवस ‘दीपावली’ म्हणून साजरा करण्यासाठी सर्व नागरिकांनी घरोघरी दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. देशभरात मकरसंक्रांतीपासून राम मंदिराच्या अभिषेक सोहळय़ापर्यंत देशभरातील मंदिरे आणि देवस्थानांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी, असेही ते म्हणाले.
आपल्याला देशासाठी नवा संकल्प
करायचा आहे, स्वत:ला नव्या ऊर्जेने भारून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्ही सर्वानी
२२ जानेवारीला घरोघरी श्री राम ज्योती लावावी आणि दीपावली साजरी करावी.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान