पीटीआय, नवी दिल्ली
भारत आणि नेपाळ यांच्या संबंधाने हिमालयाची उंची गाठावी यासाठी प्रयत्न करत राहू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर दिले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये गुरुवारी विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. या वेळी दोन्ही देशांमधील सीमावाद आणि इतर प्रश्न सोडवण्यावर एकमत झाले.
चर्चेनंतर माध्यमांना दिलेल्या निवेदनामध्ये मोदी यांनी नमूद केले की, भविष्यामध्ये दोन्ही देशांतील संबंध सुदृढ करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. गुरुवारी दोन्ही नेत्यांनी संयुक्तरीत्या काही प्रकल्पांचे दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केले आणि काही प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच भारत आणि नेपाळदरम्यान काही करारांवर सह्या करण्यात आल्या. त्यामध्ये सीमापार पेट्रोलियम पाइपलाइन, संयुक्त चेकपोस्ट उभारणे आणि जलविद्युत ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवणे यांचा समावेश आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचा निश्चय दोन्ही नेत्यांनी केला.
या वेळी पंतप्रधान प्रचंड यांनी पंतप्रधान मोदींच्या शेजाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या धोरणाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध अतिशय जुने आणि बहुआयामी आहेत.
राष्ट्रपतींकडून प्रचंड यांचे स्वागत
नेपाळ हा भारतासाठी नेहमी प्राधान्यक्रमावरील देश राहिला आहे, असे आश्वासन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी नेपाळच्या पंतप्रधानांना दिले. पंतप्रधान पुष्पकमल प्रचंड यांनी राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. त्या वेळी दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे राष्ट्रपतींनी त्यांना सांगितले.