पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दोन दिवसांपूर्वी कर्नाटकच्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात सफारीचा आनंद घेतला. यावेळी मोदींना अपेक्षा होती वाघांच्या दर्शनाची. मात्र, त्यांना सफारीदरम्यान वाघांचं दर्शनच न झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीकाही केली. मात्र, आता मोदींना वाघ का दिसले नाहीत? यावर खल सुरू झाला असून मोदींच्या सफारीआधी पाच दिवस चाललेल्या सुरक्षा यंत्रणांच्या ड्रिलमुळेच हे सगळं घडल्याचं समोर येऊ लागलं आहे.
नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पामध्ये सफारीसाठी दाखल झाले. सकाळी ७ वाजून १५ मिनिटांपासून ९ वाजू ३० मिनिटांपर्यंत पंतप्रधानांनी सफारीचा आनंद घेतला. मात्र, या संपूर्ण प्रवासात त्यांना वाघाचं दर्शन काही झालं नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी सफारीनंतर वाघ न दिसल्याची तक्रारवजा प्रतिक्रियाही बीटीआरच्या अधिकाऱ्यांकडे केल्याचं सांगितलं जात आहे. या सफारीमध्ये मोदींना वाघाच्या पंजाच्या खुणा दिसल्या. त्याबरोबरच हत्ती, हरीण असे जंगली प्राणीही दिसले. मात्र, वाघाचं दर्शन होऊ शकलं नाही.
सुरक्षा यंत्रणांच्या ड्रिलमुळे वाघ झाले गायब?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना सफारीदरम्यान वाघ न दिसण्यामागे त्यांच्या सुरक्षा पथकांनी त्याआधी तब्बल पाच दिवस केलेली ड्रिल कारणीभूत ठरल्याचं आता बोललं जाऊ लागलं आहे. पंतप्रधान मोदींनी तब्बल २२ किलोमीटर प्रवास केला. त्याच मार्गावर त्यांच्याआधी त्यांचं सुरक्षा पथक, सुरक्षा अधिकारी, एसपीजी कमांडो, स्थानिक पोलीस, नक्षलविरोधी दल अशा सर्व सुरक्षा पथकांनी अनेक सफारी केल्या होत्या. यासाठी सुरक्षेचं कारण पुढे करण्यात आलं. विशेष म्हणजे या पथकांना वाघांचं दर्शन झालं, पण प्रत्यक्ष मोदींच्या सफारीवेळी मात्र वाघ जंगलात गायब झाले होते!
वन्य पशूंना आणि वाघांनाही अशा सफारीवेळी गाड्या त्या मार्गावरून जात असल्याची आता सवय झाली आहे. पण फक्त या रविवारीच वाघ जंगलातल्या आतल्या शांत भागात गेले असावेत, असा अंदाज प्रकल्प अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आल्याचं द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर! जंगल सफारीसाठी केलेला खास लुक चर्चेत
पहिल्या गाडीचा आग्रह आणि सुरक्षा पथकांची ड्रिल!
या वृत्तानुसार, सुरक्षा पथकातील हे सर्व सदस्य मोदींच्या सफारीआधी पाच दिवस त्याच मार्गावर फिरत होते, मुक्काम करत होते आणि झोपतही होते. सुरक्षेच्या कारणास्तव मोदींची गाडी ताफ्याच्या मधोमध ठेवण्याचा त्यांचा आग्रह होता. पण वाघ पाहाण्यासाठी अग्रभागी असणाऱ्या गाडीत बसणं जास्त योग्य असल्याचं प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं. त्यामुळे या पथकातील सदस्य पुन्हा सुरक्षेची खातरजमा करण्यासाठी सफारीवर गेले. त्यांना त्या मार्गावर वाघ, बिबटे दिसल्यानंतरच त्यांनी मोदी अग्रभागीच्या गाडीत असतील, हे निश्चित केलं!
…म्हणून किमान वाघाच्या पंजाचे ठसे तरी दिसू शकले!
दरम्यान, वाघ जंगलात निघून जाऊ शकतात, त्यामुळे किमान शनिवारी रात्री सेक्युरिटी ड्रिल करू नये, अशी विनंती बीटीआरच्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर अखेर शनिवारी रात्री कोणतीही ड्रील झाली नाही. त्यामुळे मोदींना किमान वाघाच्या पंजांचे ताजे ठसे तरी दिसू शकले. त्याबरोबरच त्यांना जवळपास ४० हत्तींचा कळप, २०-३० गौर, जवळपास ३० सांबर आणि इतर वन्य प्राणीही दिसले. पण त्यांना वाघ दिसू शकला नाही, अशी माहितीही बीटीआर अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.