पीटीआय, संयुक्त राष्ट्रे
मानवतेचे यश हे आपल्या सामूहिक सामर्थ्यामध्ये आहे, युद्धभूमीवर नाही असे स्पष्ट प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा युद्धाला विरोध असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर जाहीरपणे सांगितले. जागतिक पातळीवर संघर्ष वाढत असताना, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये सोमवारी भविष्यासाठी शिखर परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपली भूमिका विषद केली.
नमस्काराने आपल्या भाषणाला सुरुवात करत मोदींनी आपण १.४ अब्ज भारतीयांचे म्हणणे मांडत असल्याचे सांगितले. संयुक्त राष्ट्रांमध्ये शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी जागतिक नेत्यांनी भविष्यासाठी करार सहमतीने स्वीकारला, त्यासह ‘जागतिक डिजिटल कॉम्पॅक्ट’ आणि ‘भविष्यातील पिढ्यांसाठी घोषणा’ ही परिशिष्टेदेखील स्वीकारण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आपल्या पाच मिनिटांच्या भाषणामध्ये मोदी म्हणाले की, जागतिक भविष्यावर चर्चा करताना आपण मानव-केंद्रित दृष्टिकोनाला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे. यावेळी मोदींनी दहशतवाद, नवीन प्रकारचे संघर्ष हे मुद्देही उपस्थित केले.
हेही वाचा >>>दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी बाजुला रिकामी खुर्ची ठेवून स्वीकरला पदभार; कारण सांगत म्हणाल्या…
संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारलेल्या करारामध्ये शाश्वत विकास, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान, तरुण आणि भविष्यातील पिढ्या व जागतिक शासनात परिवर्तन यांचा समावेश आहे.
‘सेमीकंडक्टर हब’साठी भारत कटिबद्ध
‘भारत जगामधील सर्वांत मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे. भारताच्या या वाढीचा अमेरिकेतील बड्या कंपन्यांनी फायदा करून घ्यावा,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) केले. जगामधील सेमीकंडक्टर उत्पादनामध्ये भारत हे महत्त्वाचे केंद्र असेल आणि त्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे, असा निर्धार मोदींनी व्यक्त केला. मोदींच्या भाषणाला अमेरिकेतील १५ बड्या कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होता.
एका बाजूला, जागतिक शांतता आणि सुरक्षेला दहशतवादाचा गंभीर धोका कायम आहे. दुसऱ्या बाजूला सायबर, सागरी प्रदेश आणि अवकाश येथे संघर्षाची व्याप्ती वाढली आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान