पीटीआय, द्रास, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अग्निपथ योजना ही लष्कराने हाती घेतलेल्या सुधारणांचे एक उदाहरण आहे. सैन्यदले तरुण राखणे, सैन्याला युद्धासाठी नेहमी सज्ज राखणे हा या योजनेमागील उद्देश आहे. मात्र, काही जणांनी हा राजकारणाचा मुद्दा केला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मोदी यांच्या आरोपाला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले, तसेच अग्निपथ योजना लष्कराने आखली असल्याचा मोदींचा दावा खोटा आहे अशी टीका पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने द्रास येथे केलेल्या भाषणात त्यांनी अग्निपथ योजना ही लष्कराने आखली होती असे सांगितले आणि विरोधकांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, काही लोक राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील मुद्द्यावरही राजकारण करत आहेत. माजी सैनिकांच्या निवृत्तिवेतनावर खर्च होणारे पैसे वाचवण्यासाठी ही योजना आखल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला. ‘‘सैन्याला तरुण राखणे, युद्धासाठी सदैव सज्ज ठेवणे हा अग्निपथ योजनेचा हेतू आहे. दुर्दैवाने काही लोक त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधांसाठी या सुधारणेवरही खोटे बोलण्याचे राजकारण करत आहेत,’’ अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा >>>‘नीटयूजी’चे सुधारित निकाल जाहीर; पैकीवंतांची संख्या ६७ वरून १७ वर

दुसरीकडे, अग्निपथ योजना ही लष्कराने आखली होती आणि आपल्या सरकारने त्याची अंमलबजावणी केली या पंतप्रधान मोदींनी केलेल्या दाव्यावर काँग्रेससह अन्य विरोधकांनी जोरदार टीका केली. मोदींचे हे विधान म्हणजे धडधडीत असत्य आहे असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘एक्स’वर लिहिले. ‘‘पंतप्रधान मोदी कारगिल विजय दिवशी शहिदांना आदरांजली वाहण्याच्या प्रसंगीही क्षुद्र राजकारण करत आहेत हे अतिशय दुर्दैवी आणि खेदजनक आहे. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी असे केले नव्हते,’’ असे त्यांनी लिहिले. खरगे यांनी माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) मनोज नरवणे यांच्या विधानाचाही संदर्भ दिला.

लष्कराने ७५ टक्के सैनिकांना सामावून घेण्याचा आणि २५ टक्के सैनिकांना चार वर्षांनंतर निवृत्त करण्याचा प्रस्ताव मांडला होता. प्रत्यक्षात मोदी सरकारने याच्या उलट केले असा आरोपही खरगे यांनी केला. या योजनेमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल असे म्हणत अनेक माजी सैन्याधिकाऱ्यांनी या योजनेवर जोरदार टीका केली आहे असे ते म्हणाले. तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षानेही या मुद्द्यावरून मोदींवर टीका केली.

हेही वाचा >>>निती आयोगाच्या बैठकीबाबत ममतांचा वेगळा सूर; मित्रपक्षांचा बहिष्कार असताना उपस्थिती

कारगिल शहिदांना आदरांजली

भारतीय सैन्याने कारगिल युद्धात विजय मिळवल्याचा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा कारगिल युद्धाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी द्रास येथे कारगिल युद्ध स्मारकावर शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर टीका केली.

अग्निपथ योजनेसंबंधी लष्कराच्या निर्णयाचा आमच्या सरकारने आदर केला, कारण आमच्यासाठी देशाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे, राजकारण नाही. लष्कराने हाती घेतलेल्या सुधारणेलाही काही लोक वैयक्तिक फायद्यासाठी विरोध करत आहेत.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) एम एम नरवणे यांनीही त्यांच्या पुस्तकात अग्निपथ योजना लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी धक्कादायक होती, असे म्हटल्याचे वृत्त आहे. हे पुस्तक सरकारनेच थांबवले.- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi criticism that the opposition is playing politics over the agneepath scheme amy
Show comments