नवी दिल्ली: भाजपविरोधात महाआघाडी करणारे विरोधी पक्षनेते भ्रष्टाचारी असून त्यांच्याकडून लोकांना केवळ कोटय़वधी घोटाळय़ांची हमी मिळेल. मी इथे हमी देतो की, प्रत्येक घोटाळेबाजांवर, प्रत्येक चोर-लुटारूवर, गरिबांना लुटणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. देशाला लुटणाऱ्यांचा हिशोब मांडला जाईल, असा चौफेर शाब्दिक हल्ला चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या ऐक्याची खिल्ली उडवली.
भोपाळमधील कार्यक्रमात मोदींनी पहिल्यांदाच विरोधकांच्या एकजुटीसाठी पाटण्यात झालेल्या बैठकीवर टिप्पणी केली. महाआघाडीतील पक्षनेते भ्रष्टाचारी असून त्यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटू लागली आहे. आपल्यावर तुरुंगात जाण्याची नामुष्की ओढवून नये म्हणून हे विरोधक भाजपविरोधात एकत्र येऊ लागले आहेत. हे विरोधक २०१४ आणि २०१९ मध्येही भाजपविरोधात एकत्र येण्याचे प्रयत्न करत होते. पण, तेव्हा ते हडबडले नसतील तितके ते आत्ता घाबरलेले आहेत. जे पक्ष एकमेकांना शत्रू मानत होते, एकमेकांना दूषणे देत होते, शिवीगाळ करत होते, तेच आता एकमेकांना साष्टांग नमस्कार घालत आहेत, असे सांगत मोदींनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी होऊन पुन्हा सत्तेवर येईल अशी ग्वाही दिली.
घोटाळय़ांच्या यादीचे वाचन
पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीचा उल्लेख ‘फोटो-ऑप कार्यक्रम’ असा करून मोदींनी विरोधी पक्षांच्या घोटाळय़ांचा एकामागून एक उल्लेख करत भाजपेतर पक्षांना नामोहरम केले. महाआघाडीतील पक्षांचा इतिहास पाहिला तर त्यांच्याकडून कमीत कमी २० लाख कोटींच्या घोटाळय़ांची हमी मिळेल. काँग्रेसचा घोटाळा तर कोटय़वधींचा आहे. १ लाख ८६ हजार कोटींचा कोळसा घोटाळा, १ लाख ७४ हजार कोटींचा २ जी घोटाळा, ७० हजार कोटींचा राष्ट्रकूल घोटाळा, १० हजार कोटींचा मनरेगा घोटाळा काँग्रेसने केला आहे. हेलिकॉप्टरपासून पाणबुडीपर्यंत असे एकही क्षेत्र नाही की ते काँग्रेसच्या घोटाळय़ांचे शिकार झाले नसेल, असे टीका मोदींनी केली.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसादांवर हजारो कोटींच्या चारा घोटाळा, पशूपालन घोटाळा केला आहे. त्यांच्या घोटाळय़ांची यादी इतकी लांबलचक आहे की त्यांची सुनावणी करून न्यायालयेही थकून गेली आहेत. लालूंना एकामागून एक शिक्षा ठोठावली जात आहे. तामीळनाडूमध्ये द्रमुकवर सव्वालाख कोटींची संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. तृणमूल काँग्रेसवरही २३ हजार कोटीहून अधिक घोटाळय़ांचा आरोप आहे. रोजव्हॅली, शारदा, शिक्षकभरती, गो-तस्करी, कोळसा तस्करी हे घोटाळे पश्चिम बंगालचे लोक कधी विसरू शकणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसवरही ७० हजार कोटींच्या घोटाळय़ाचा आरोप आहे. राज्य सहकारी बँकेचा घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खाणघोटाळा या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. या पक्षांकडे फक्त घोटाळय़ांचा अनुभव आहे, असे मोदी म्हणाले.
तुष्टीकरण नव्हे, संतुष्टीकरण!
भ्रष्टाचार, कमिशन, कट-मनी, मलई मिळवणे सोपे असते. हे तुष्टीकरणाचे राजकारण भाजप कधीही करत नाही. संतुष्टीकरणाचा मार्गच देशाला विकासाकडे घेऊन जातो.
नेत्यांच्या नव्हे, स्वत:च्या कुटुंबाचे भले करा!
गांधी कुटुंब, मुलायम यादव, लालूप्रसाद, शरद पवार, अब्दुल्ला, करुणानिधी, के. चंद्रशेखर या सगळय़ांच्या मुला-मुलींचे भले करायचे असेल तर त्यांना मते द्या. पण, तुम्हाला स्वत:च्या कुटुंबाचे भले करायचे असेल तर भाजपला मते द्या. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरिबांनी ज्यांना मते दिली त्यांनी कुटुंबाच्या नावावर मत मागणाऱ्यांनी स्वत:च्या कुटुंबाचेच भले केले हे विसरू नका, असे आवाहन मोदींनी केले.