पीटीआय, जमशेदपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस नेते राहुल गांधी माओवाद्यांची भाषा वापरत आहेत. काँग्रेसशासित राज्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपन्या ५० वेळा विचार करतील, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली.

झारखंडमधील जमशेदपूर येथे भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेला संबोधित करताना मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेला काँग्रेस लोकसभेच्या जागा ‘वडिलोपार्जित मालमत्ता’ मानत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी या पक्षावर घराणेशाहीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी वापरलेली भाषा कोणत्याही उद्योगपतीला पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ५० वेळा विचार करायला लावेल. राहुल गांधी हे माओवाद्यांकडून बोलली जाणारी भाषा वापरत असून नवनवीन पद्धतीने पैसे उकळत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा >>>राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेला न जाणं काँग्रेसची चूक होती? प्रियांका गांधी म्हणाल्या, “भाजपाने आम्हाला…”

‘काँग्रेसला अदानी-अंबानींकडून भरपूर पैसे मिळतात असे पंतप्रधान बोलतात, पण त्यांची चौकशी करण्याची त्यांची हिंमत नाही,’ असे काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी म्हटले होते. हाच धागा पकडून मोदींनी राहुल गांधींवर टीका केली. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नक्षलवाद्यांचा कणा मोडला आहे, परंतु काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांनी निधी उकळण्याची जबाबदारी घेतली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांतील मुख्यमंत्री राहुल गांधी यांच्या उद्योगविरोधी आणि उद्योजकविरोधी भाषेशी सहमत आहेत का, असा सवाल मोदींनी विचारला.  

ममता बॅनर्जीच्या वक्तव्याचा निषेध

बिष्णुपूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रम संघाविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविववारी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. आपली मतपेढी वाचविण्यासाठी तृणमूल काँग्रेस सामाजिक-धार्मिक संघटनांनाही धमक्या देत आहेत, अशी टीका मोदींनी केली. रामकृष्ण मिशन व भारत सेवाश्रमचे काही संन्यासी तृणमूलविरोधात काम करत असून त्यांना दिल्लीहून आदेश देण्यात येतात, असा आरोप शनिवारी ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यावर पंतप्रधान म्हणाले की, तृणमूल काँग्रेसने सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून नैतिकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या संघटनांना खुल्या व्यासपीठावरून धमकी दिली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi criticizes rahul gandhi use of maoist language amy
Show comments