पीटीआय, रामेश्वरम

‘केंद्र सरकारने वाढीव निधी राज्याला दिल्यानंतरही काही जण निधीवरून रडगाणे गातात,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तमिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर नाव न घेता केली. रामेश्वरम येथे कार्यक्रमात ते बोलत होते.

रामेश्वरमला जोडणाऱ्या पंबन पुलाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण केले. हा पूल देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल आहे. तसेच, ८३०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले. मोदी यांनी बोलताना तमिळनाडूमधील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य असल्याचे म्हटले.

मोदी म्हणाले, ‘गेल्या दशकभरात केंद्र सरकारने तमिळनाडूला २०१४ पूर्वी राज्याला दिलेल्या निधीच्या तुलनेत तिप्पट रक्कम दिली आहे. तमिळनाडूत पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य आहे. गेल्या दशकात रेल्वे अर्थसंकल्पात सातपटींनी वाढ झाली. वाढीचा वेग इतका असूनही काही लोक कुठल्याही आधाराशिवाय तक्रार करत राहतात.’ तमिळनाडू ही माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची भूमी असल्याचे मोदी म्हणाले.

तमिळ भाषेवरून उपरोधिक टीका

मोदी यांनी या वेळी तमिळ भाषेच्या अधिकाधिक वापराचा आग्रह राज्यातील नागरिकांना केला. ‘तमिळ भाषा जगभरात नेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, राज्य सरकारने वैद्याकीय शिक्षण मातृभाषेतून करावे,’ असा सल्लाही त्यांनी दिला. ‘तमिळनाडूतील राजकीय नेत्यांची पत्रे मला येतात. मात्र, त्यांची साधी सहीदेखील तमिळ भाषेतून नसते. किमान तुमची सही तरी तमिळ भाषेतून करा,’ असे मोदी म्हणाले.

पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन

अत्याधुनिक अभियांत्रिकीचा वापर करून तयार केलेल्या देशातील पहिल्या पंबन येथील ‘व्हर्टिकल लिफ्ट सागरी रेल्वे पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

रामेश्वरम बेट आणि मुख्य भूमीला हा पूल रेल्वे मार्गाने जोडतो. पंतप्रधानांनी रामेश्वरम-तांबरम (चेन्नई) रेल्वे आणि तटरक्षक दलाच्या नौकेलाही हिरवा कंदील दाखविला. जहाजांना समुद्रातून जायचे असेल, अशा वेळी हा पूल वर उचलला जाण्याची सोय आहे.

स्टॅलिन यांची अनुपस्थिती : पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री स्टॅलिन अनुपस्थित होते. उपस्थित राहणार नसल्याचे कळविले असल्याचे त्यांनी सांगितले. स्टॅलिन यांनी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेला विरोध केला असून, पंतप्रधानांनी त्यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.