पीटीआय, अजमेर
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ावर बहिष्कार टाकणाऱ्या काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या इमारतीच्या बांधणीसाठी कष्ट घेणाऱ्या ६० हजार मजुरांच्या भावनांचा अपमान केला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. राजस्थानातील अजमेर येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी प्रथमच विरोधकांच्या बहिष्काराबाबत वक्तव्य केले.
रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले होते. मात्र राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्याची मागणी करत काँग्रेससह २१ पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. आतापर्यंत पंतप्रधानांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. मात्र मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सुरू झालेल्या ‘महाजनसंपर्क अभियाना’तील पहिल्याच जाहीर सभेत मोदी यांनी विरोधकांच्या बहिष्कारावर तोफ डागली. ‘‘तीन दिवसांपूर्वी देशाला नवे संसद भवन मिळाले, याचा तुम्हाला अभिमान वाटतो की नाही? देशाची शान वाढल्याचा तुम्हाला आनंद आहे की नाही? मात्र काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी यात राजकारण आणून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला,’’ अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.