वैशिष्टय़पूर्ण किशनगंगा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित
श्रीनगर : निसर्गाबरोबरच प्रतिकूल सामाजिक स्थिती, दहशतवादाचे सावट आणि सैन्याच्या घडामोडी आदी सर्व परिस्थितीवर मात करीत काश्मीरच्या खोऱ्यात किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून वीज जन्मली आहे. श्रीनगरपासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरेझमध्ये किशनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाच्या माध्यमातून बंडीपुरा जिल्ह्यतील मंत्रीगाम गावात हा वैशिष्टय़पूर्ण जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कार्पोरेशनच्या (एनएचपीसी) या महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक प्रकल्पाचे काम हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने (एचसीसी) इतर भागीदारांच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. श्रीनगरपासून ८० किलोमीटर अंतरावर मंत्रीगाममध्ये जलविद्युत प्रकल्प आहे, तर तेथून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर किशनगंगा धरण उभारण्यात आले आहे. धरणातून जलविद्युत प्रकल्पापर्यंत तयार करण्यात आलेला बोगदा हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. किशनगंगा धरणापासून डोंगरामधून जाणारा ९.५ मीटर व्यासाचा तब्बल २३.२४ किलोमीटर अंतराचा हा बोगदा आहे. डोंगराच्या नैसर्गिक उतारानुसार हा बोगदा प्रचंड वेगाने पाणी घेऊन जलविद्युत प्रकल्पापर्यंत येतो आणि पाण्याच्या शक्तीमुळे जलविद्युत केंद्रातील मोठी पाती (टर्बाइन) फिरविली जातात. त्यातून वीजनिर्मिती होते. ११० मेगावॉट क्षमतेचे तीन संच या प्रकल्पात असून, संपूर्ण प्रकल्पाची क्षमता ३३० मेगावॉट इतकी आहे. या प्रकल्पात निर्माण होणारी वीज सध्या नॅशनल ग्रीडला जोडण्यात आली आहे. बोगद्यातून दळणवळणाच्या वाहिन्याही टाकण्यात आल्याने दोन विभाग एकमेकांना जोडण्यासही मदत झाली आहे.
किशनगंगा प्रकल्पाची तांत्रिक बाजू वैशिष्टय़पूर्ण असली, तरी ती साकारण्यासाठी कोणतीही स्थिती अनुकूल नसल्याचे वास्तव आहे. या भागामध्ये साधारणत: सप्टेंबरपासूनच बर्फवृष्टी सुरू होते. निसर्गाबरोबरच सामाजिक स्थितीही प्रतिकूल आहे. काश्मीरमध्ये कधी कोणत्या कारणाहून दंगल, दगडफेक होईल हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे दहशतवादाचे आणि लष्करी घडामोडींचेही सावट असते. या सर्व परिस्थितीचा फटका प्रकल्पाला बसला. अनेकदा काही महिन्यांसाठी काम बंद ठेवावे लागले. त्यामुळे २००९ मध्ये सुरू झालेला प्रकल्प पूर्णत्वास येण्यास विलंब झाला.
विसर्ग, वीजनिर्मितीनंतरही पाणी पाकिस्तानात!
किशनगंगा नदीच्या नैसर्गिक प्रवाहानुसार तिचे पाणी गुरेझमधून थेट पाकिस्तानात झेलम नदीला जाऊन मिळते. आता किशनगंगावर गुरेझमध्ये बांधलेले धरण आणि याच पाण्याच्या वापरातून मंत्रीगाम येथे होणारी जलविद्युत निर्मिती यामुळे झेलम नदीत जाणाऱ्या पाण्याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. प्रत्यक्षात धरणातून होणारा विसर्ग आणि जलविद्युत निर्मितीनंतर दोन्ही ठिकाणचे पाणी झेलममार्गे पाकिस्तानातच जाते आहे. धरणात सातत्याने पाणी जमा होत असल्याने त्याचा विसर्ग करावा लागतो. विसर्गानंतर हे पाणी थेट पाकिस्तानात जाते. मंत्रीगाम येथे जलविद्युत निर्मितीनंतर बाहेर पडणारे पाणी सुरुवातीला बोणार नाल्यातून उलर तलावात जाते आणि तेथून हे पाणी झेलम नदीत जाऊन मिळते.
अनेक मजूर, अधिकाऱ्यांचे पलायन
निसर्ग, सामाजिक स्थिती आदी सर्वच बाबी प्रतिकूल असल्याने किशनगंगा प्रकल्प साकारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याबाबत एचसीसीचे प्रकल्प अधिकारी ए. आय. बेन्नी यांनी सांगितले की, प्रकल्पासाठी आपण २००९ पासून या भागात वास्तव्यास आहोत. काश्मीरमध्ये कधी दंगली होतात, रस्ते, व्यवहार बंद होतात. त्याचा प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला. गोळीबार झाल्यानंतर घाबरून अनेक मजूर त्याचप्रमाणे अधिकारीही काम सोडून पळून गेले. त्यामुळे या मंडळींना परत आणण्याचे महाकठीण कामही करावे लागले.