पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी जमा केले. केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. देशातल्या वेगवेगळया भागातील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेताना, मोदींनी महाराष्ट्रातील लातूरमधील शेतकऱ्याशी संवाद साधला.
आणखी वाचा- “पश्चिम बंगाल सरकारच्या राजकीय स्वार्थामुळे ७० लाखांहून अधिक शेतकरी लाभापासून वंचित”
गणेश भोसले असे या शेतकऱ्याचे नाव आहे. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अवसा तालुक्याती मातुला गावात हा शेतकरी राहतो. त्याची तीन हेक्टरची शेती असून, यात तो सोयाबीन, तूर ही पीके घेतो. शेतीशिवाय आपल्याकडे नऊ गायी आणि तेरा म्हशी असल्याचे त्याने सांगितले. दूध विक्रीचा सुद्धा व्यवसाय असल्याचे गणेश भोसलेंनी मोदींना सांगितले.
शेती कि, पशूपालनातून जास्त कमाई होते ? असा प्रश्न मोदींनी विचारला. त्यावर दोघांमधून बऱ्यापैकी उत्पन्न मिळते, त्यातून घर आणि शेती चालते असे त्यांनी सांगितले. गणेश भोसले यांनी पंतप्रधान कृषी विमा योजना काढली होती. या कृषी विमा योजनेचा लाभ झाला का? असा प्रश्न मोदींनी या शेतकऱ्याला विचारला.
आणखी वाचा- शेतकरी त्याचे उत्पादन हवे तिथे विकू शकतो, मग सुधारणांमध्ये चूक काय? – पंतप्रधान मोदी
२०१९ मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेत २५८० रुपयाचा हप्ता भरला होता. मागच्यावर्षी सोयाबीनच्या पीकाचे नुकसान झाले. तेव्हा पीक विमा योजनेमुळे ५४ हजार ३१५ रुपये मिळाल्याचे त्यांनी मोदींना सांगितले. तुम्ही २५८० रुपये भरले आणि ५४ हजार रुपये मिळाले, हे गावातील सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे का? त्यावर भोसलेंनी, हो सर्वांना माहिती आहे, असे उत्तर दिले. मोदींनी नंतर भाषण करताना पंतप्रधान कृषी विमा योजनेचे महत्त्व पटवून देताना महाराष्ट्रातील या शेतकऱ्याचे उदहारण दिले.