केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे केले आहेत. हे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले. त्यानंतर सरकारच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना कसा लाभ होतोय, हे त्यांच्याकडून जाणून घेतले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद झाल्यानंतर मोदींनी शेतकऱ्यांना उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी तीन नव्या कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. हा कायदा कसा योग्य आहे, त्यात शेतकऱ्यांचे कसे हित दडले आहे. ते सविस्तरपणे समजावून सांगितले. केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीय. तिथलं सरकार राजकीय कारणांमुळे हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीय असं मोदी म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.
आणखी वाचा- पंतप्रधान मोदींच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील शेतकरी गणेश भोसलेंनी दिलं ‘हे’ उत्तर
कृषी सुधारणा कायद्यांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “नव्या कायद्यामुळे शेतकरी त्यांचे उत्पादन हवे तिथे विकू शकतात. जिथे तुम्हाला चांगला मोबदला मिळेल, तिथे तुम्ही पिकवलेली वस्तू विका”. “तुम्हाला बाजारपेठेत, खरेदीदारांना उत्पादन विकायचे असेल, तर विकू शकता. शेतकऱ्यांना हे स्वातंत्र्य मिळत असेल तर त्या सुधारणांमध्ये चुकीचे काय आहे?” असा सवाल मोदींनी केला.
“काही लोकांना फक्त खोटी माहिती पसरवण्यामध्ये रस आहे. या कायद्यामुळे बाजारपेठ आणि एसएसपी पद्धत जाईल असे पसरवले जात आहे. पण असे काही घडणार नाही” असे मोदी म्हणाले. “नवे कृषी कायदे शेतकऱ्याला बळ देणारे आहेत. आधी शेतकऱ्यासाठी जोखीम जास्त असायची. पण आता उलटं झालं आहे. शेतकरी अधिक सुरक्षित असेल तर करार करणाऱ्याला किंवा कंपनीची जोखीम जास्त असेल” असे मोदींनी सांगितले.
आणखी वाचा- “पश्चिम बंगाल सरकारच्या राजकीय स्वार्थामुळे ७० लाखांहून अधिक शेतकरी लाभापासून वंचित”
“शेतकऱ्याला वाटलं तर तो करार रद्द करु शकतो पण करार करणारी कंपनी असा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आमच्या सरकारला विरोध करणाऱ्यांबरोबरही आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण तर्क आणि मुद्यांवर चर्चा होईल” असे मोदींनी स्पष्ट केले.
मोदींच्या संबोधनातील मुद्दे
– शेतकऱ्याची जमीन कोणी घेऊ शकणार नाही.
– शेतकऱ्याच्या जीवनातील आनंद हा सर्वांचा आनंद आहे.
– आधी पीक वाया जायचे आता विकले जाते.
– शेतकऱ्यांच्या जमिनीवरुन भ्रम निर्माण केला जात आहे.
– आज रुपया चुकीच्या माणसाच्या हातात जातात नाही.
– आज दिल्लीवरुन रुपया निघतो, तेव्हा तो त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होतो.
– संगणकाच्या एका क्लिकवरुन नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा झाले. यात कुठला कट नाही, हेराफिरी नाही. हेच सुशासन आहे.
– देशातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतोय. पण फक्त एकमात्र पश्चिम बंगालमधील ७० लाख शेतकरी या योजनेचा लाभ मिळत नाहीय.
– कारण बंगालमधील सरकार राजकीय कारणामुळे त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू देत नाहीय. यात राज्याला एक पैसा भरायचा नाहीय.
– पश्चिम बंगालमध्ये तीस वर्ष एका पक्षाचे सरकार होते. त्याच पक्षाचे लोक आता पंजाबमध्ये येऊन शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत. तुमच्या मनात शेतकऱ्यांबद्दल इतके प्रेम आहे मग, पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पैसे मिळावे म्हणून का आंदोलन केले नाही ? असा सवाल मोदींनी केला.
– बंगालचे ज्यांनी नुकसान केले ते आता दिल्लीत आंदोलन करतायत. पंजाबच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. त्याच पक्षाचे केरळमध्ये सरकार आहे. तिथे एपीएमसी नाहीय. मग केरळमध्ये एपीएमसीसाठी आंदोलन का करत नाही? असा सवाल मोदींनी केला.
– आधीच्या सरकारच्या धोरणामुळे छोटया शेतकऱ्याचे नुकसान झाले. छोटया शेतकऱ्यांना बँकांकडून पैसे मिळत नव्हते कारण त्यांच्याकडे बँक खाते नव्हते. छोटया शेतकऱ्यांना पाणी, वीज मिळत नव्हती. ते कोणाच्या गणतीमध्येच नव्हते.
– इतकी वर्ष सत्ता उपभोगली पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून दिले. गरीब शेतकरी अजून गरीब झाला.
– आमच्या सरकारने नव्या धोरणाने काम सुरु केले. शेतकऱ्याला भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यावर भर दिला. जगामध्ये काय नवे घडतेय, त्याची माहिती घेतली. सखोल अभ्यास केला आणि त्या दृष्टीने काम केले.
– छोटया शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहे. आयुष्मान योजनेमुळे शेतकऱ्याचे जीवन सुधारले. अडीज कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळाले.
– शेतकरी त्यांचे पीक विकण्यासाठी स्वतंत्र आहेत. न्यूतम समर्थन मूल्य एमएसपी किंमतीला तुम्हाला पीक विकायचे असेल तर तुम्ही विकू शकता असे मोदींनी सांगितले.
– कृषी सुधारणांवरुन खोटी माहिती पसरवली जात आहेत असे मोदी म्हणाले.
– नवे कृषी कायदे शेतकऱ्याला बळ देणारे आहेत. आधी शेतकऱ्यासाठी जोखीम जास्त असायची. पण आता उलटं झालं आहे. शेतकरी अधिक सुरक्षित असेल तर करार करणाऱ्याला किंवा कंपनीची जोखीम जास्त असेल.
– शेतकऱ्याला वाटलं तर तो करार रद्द करु शकतो पण करार करणारी कंपनी असा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
– आमच्या सरकारला विरोध करणाऱ्यांबरोबरही आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण तर्क आणि मुद्यांवर चर्चा होईल असे मोदींनी स्पष्ट केले.