काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर त्यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर टीकेचे बाण चालवले. मोदी आणि अदाणी यांचं नातं आहे तरी काय? अदाणींच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी नेमके कुणाचे आहेत हे प्रश्नही आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी उपस्थित केले. तसंच मोदी माझ्या भाषणामुळे टेन्शनमध्ये आले आहेत. माझ्या लोकसभेतल्या भाषणाला ते घाबरतात म्हणून त्यांनी ही कारवाई केली आहे असंही राहुल गांधींनी म्हटल आहे.
काय म्हटलं आहे राहुल गांधींनी?
राहुल गांधी म्हणाले की अदाणीच्या मुद्द्यावर मी भाषण केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत. मी ही भीती त्यांच्या डोळ्यात पाहिली आहे. त्यामुळे असे मुद्दे बाहेर काढून माझ्याविरोधात कारवाई करण्यात आली. त्यानंतर माझं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. मी संसदेत गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विमानात बसलेला फोटो दाखवला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हापासून मोदी आणि अदाणी यांचे सलोख्याचे संबंध आहेत. सध्या जे काही होतं आहे तो लोकशाहीवरचा हल्ला आहे. संसदेत भाजपाचे मंत्री माझ्याविरोधात खोटं बोलले. मी विदेशात जाऊन त्यांच्याकडे मदत मागितली हे पूर्णपणे खोटं आहे तरीही ते सोयीस्कर पद्धतीने पसरवण्यात आलं असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
माझा मार्ग सत्याचा आहे मी त्यावरच चालत राहणार
माझ्यावर कारवाई करा, सदस्यत्व तर गेलंच आहे. पण मी भाजपाला घाबरत नाही. मी प्रश्न विचारतच राहणार. आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की देशात पूर्वी जसा सगळ्या पक्षांना माध्यमांकडून पाठिंबा मिळत होता तसा आता मिळत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे जनतेत जाण्याचा. मी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान जर हे म्हणत होतो की बंधुभाव जपला पाहिजे. सगळे एकच आहेत. सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे हे म्हटलं होतं.
अदाणींच्या शेल कंपन्यांना २० हजार कोटी कुणी दिले?
माझ्या विरोधात आता ओबीसी एकवटले आहेत पण प्रकरण ते नाही. हे नरेंद्र मोदी आणि अदाणी यांच्या २० हजार कोटींचं प्रकरण आहे. मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. या मुद्द्यावर कुणीही उत्तर देत नाही. अदाणींचे ते पैसे असूच शकत नाहीत. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही म्हणूनच विविध मुद्दे काढले जात आहेत असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. मला सत्य आवडतं मी तेच बोलत असतो. माझ्या रक्तात सत्य आहे. मी सत्याच्या मार्गावर चालतो आहे. मला तुरुंगात टाका, माझं सदस्यत्व करा मी माझ्या मार्गावर चालत राहणार. या देशाने मला सगळं काही दिलं आहे. प्रेम दिलं आहे, आदर दिला आहे, आपुलकी दाखवली आहे त्यामुळे मी सत्याच्या मार्गावर मी चालत राहणार.
माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही
एक लक्षात ठेवा माझं आडनाव हे राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही. त्यामुळे मी माफी मागणार नाही. माझं सदस्यत्व रद्द केलं गेलं आहे. मला ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो. आपण सगळे एकजूट होऊन काम करू. माफी मागण्याचा काही प्रश्नच येत नाही. गांधी कधीही माफी मागत नाहीत. माझं आडनाव सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही.