‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी आज(गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडत आहे. नवीन संसद भवनासाठी ९७१ कोटींच्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उद्योगपती रतन टाटा आदी मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावलेली आहे. ‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’कडे नवीन संसद भवनाच्या उभारणीचं कंत्राट देण्यात आले आहे. नवीन संसद भवनाची इमारत चार मजली असणार आहे.
#WATCH Live from Delhi: PM Modi lays foundation stone of New Parliament Building https://t.co/BRwhufPecZ
— ANI (@ANI) December 10, 2020
नवे संसद भवन उभारण्याच्या ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत कोणतेही नवे बांधकाम आणि प्रकल्पस्थळी कोणतीही तोडफोड करण्यात येणार नाही, अशी हमी दिल्यानंतर १० डिसेंबरच्या नियोजित कोनशिला समारंभास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला परवानगी दिली होती.
‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाचा केवळ कोनशिला समारंभ करण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकांवर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बांधकाम, तोडफोड आणि झाडांचे स्थलांतर करण्यात येणार नाही, अशी हमी महान्यायवादी तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला दिली होती. त्यानंतर खंडपीठाने कोनशिला समारंभ करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
या नियोजित संसद भवनात ९०० ते १२०० खासदारांची बैठक व्यवस्था असून हा सुमारे ९७१ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
“नव्या संसद भवनाची क्षमता ही जुन्या भवनापेक्षा अधिक असून नव्या भवनात एकाच वेळी लोकसभा सदस्यांसाठी सुमारे ८८८ जागा उपलब्ध असतील, तर राज्यसभा सदस्यांसाठी ३२६ पेक्षा अधिक जागा उपलब्ध असतील. म्हणजेच नव्या संसद भवनात एकूण १,२२४ सदस्य एकाचवेळी बसू शकतील. ७५ व्या स्वातंत्र्यदिनी आपण या नव्या संसद भवनातून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु करणार आहोत.” अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली होती.
नव्या संसद भवनाचा १० डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा
तसेच, “नव्या संसदेची इमारत ही आत्मनिर्भर भारताचं मंदिर असेल. यामध्ये भारतातील विविधतेचं दर्शन घडेल. जुन्या संसद भवनाच्या इमारतीपेक्षा नवी इमारत १७,००० स्केअर फूट मोठी असेल. एकूण ६४,५०० स्केअर मीटर जागेत ही वास्तू उभारली जाणार आहे. यासाठी ९७१ कोटी रुपये खर्च येणार असून ‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’कडे या इमारतीच्या उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे. एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीने या इमारतीचे डिझाईन बनवले आहे,” अशी माहितीही बिर्ला यांनी दिली होती.