नवी दिल्ली: महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयाने देशाला ‘एक है तो सेफ है’चा महामंत्र दिला आहे. मतदारांनी काँग्रेसच्या विभाजनवादी राजकारणाचा पराभव केला असून एकतेचा संदेश दिला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महायुतीच्या प्रचंड यशाचे कौतुक केले. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीला धूळ चारली. राज्यात सलग तिसऱ्यांदा भाजप विजय झाली. भाजपच्या मुख्यालयातील झालेल्या विजयोत्सवात कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना विजयाचे श्रेय दिले.
भाजप वा भाजपआघाडीला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवून देणारे महाराष्ट्र हे सहावे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील जनतेने जात, धर्म, भाषा, प्रांत या भेदाभेदांच्या पलिकडे जाऊन भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना मते दिली. दलित, आदिवासी, ओबीसींसह समाजातील प्रत्येक घटकांनी महायुतीला पाठिंबा दिला. त्यांच्या या भूमिकेमुळेच काँग्रेस व महाविकास आघाडीचा समाजामध्ये फूट पाडण्याचे कुटील कारस्थान अपयशी ठरले, असे मोदी म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजप सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष ठरला. यावेळी तर सर्व विक्रम मोडले गेले. ५० वर्षांनंतर पहिल्यादा निवडणूकपूर्व आघाडीला इतके भरघोस यश मिळाले आहे. गेल्यावेळीही युतीला मतदारांनी कौल दिला होता. पण, काही जणांच्या वेगळ्या इराद्यामुळे काही काळासाठी भाजपला सत्ता गमवावी लागली होती, असे म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
महायुतीचा महाराष्ट्रातील विजय हा विकास, सुशासन आणि समाजिक न्यायाचा विजय ठरला आहे. मतदारांनी काँग्रेसच्या घराणेशाहीला नाकारले आहे. काँग्रेसला देशाचा मूड काय आहे हेच समजलेले नाही. काँग्रेसला वास्तव कळलेले नाही. देश अस्थिर झालेला लोकांना मान्य नाही. देशाच्या हिताला लोकांनी प्राधान्य दिले आहे. संविधान, आरक्षणाबाबत काँग्रेसने लोकांची दिशाभूल केली आहे. या देशात एकच संविधान असेल. त्या आधारावर कोणताही पक्ष समाजामध्ये फूट पाडू शकत नाही, अशी ग्वाही मोदींनी दिली.
हेही वाचा : Jharkhand Vidhan Sabha Election Result : भाजपावर JMM भारी; झारखंडमध्ये एनडीएचा दारूण पराभव!
सुमारे ५० मिनिटांच्या भाषणात मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्री फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींना अभिवादन केले. मोदींनी मराठीतून महाराष्ट्रातील जनतेचेही आभार मानले.
उध्दव ठाकरेंना मतदारांनी नाकारले नड्डा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेले यश ऐतिहासिक असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. २०१९ मध्येही भाजप-शिवसेना युतीने विजय मिळवला होता. पण, उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. या निवडणुकीत राज्यातील मतदारांनी ठाकरेंनाच नाकारले. मोदी आणि महायुतीच्या मागे उभे असल्याचा स्पष्ट कौल लोकांनी दिला आहे. महाराष्ट्रातील विजयाने देशातील जनतेचा मूड स्पष्ट केला आहे, असेही नड्डा म्हणाले.