पीटीआय, पोर्ट लुई
भारत आणि मॉरिशसने द्विपक्षीय संबंधांना सामरिक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. आपल्या मॉरिशस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिणेकडील देशांच्या (ग्लोबल साउथ) विकासाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सर्वांसमोर ठेवले. या दौऱ्यात दोन्ही देशांत आठ वेगवेगळे करार करण्यात आले.
हिंदी महासागरात चीनचा वाढता वावर पाहता मॉरिशसबरोबरील संबंधांना भारताने महत्त्व दिल्याचे मानले जात आहे. दोन्ही देशांत सीमापार व्यवहार करताना राष्ट्रीय चलनाचा वापर, समुद्रातील माहितीचे आदानप्रदान करणे, पैसा गैरव्यवहाराला संयुक्तपणे सामोरे जाणे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्याोगांमध्ये (एमएसएमई) सहकार्य वाढविणे अशा विविध क्षेत्रांचा करारामध्ये समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी ते मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाला मुख्य अतिथी होते. भारताच्या सुरक्षा दलातील एक तुकडीही या वेळी झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाली. तसेच, नौदलाची एक युद्धनौका व हवाई दलाचे ‘स्काय डायव्हिंग’ पथक सहभागी झाले.
मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मोदी यांनी ‘ग्लोबल साउथ’च्या विकासाचे नवे उद्दिष्ट मांडले. त्याला ‘म्युच्युअल अँड होलिस्टिक अॅडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अॅक्रॉस रिजन्स’ अर्थात ‘महासागर’ असे नाव दिले. हिंदी महासागरात चीनचा सातत्याने प्रभाव निर्माण करण्याच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर या नव्या धोरणाला महत्त्व आहे. मोदींनी २०१५मध्ये मॉरिशस भेटीत ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन’ अर्थात ‘सागर’ या धोरणाची घोषणा केली होती.
पंतप्रधान मोदींनी विविध विकासकामांचीही या वेळी घोषणा केली. मॉरिशसचे ५० कोटी रुपयांचे विविध विकास प्रकल्प राबविले जाणार आहे. अटलबिहारी वाजपेयी लोकसेवा आणि नवनिर्मिती संस्था उभारणीसाठीही दोन्ही देशांनी या वेळी कटिबद्धता व्यक्त केली.
भारत-मॉरिशसमधील नवे सुदृढ संबंध
● तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानातून सहकार्य
● सवलतीत कर्जे आणि अनुदाने
● मॉरिशसमधील नव्या संसदेच्या इमारतीच्या उभारणीमध्ये भारताचे सहकार्य
● मॉरिशसच्या तटरक्षक दलाला आवश्यक ती सर्व मदत.
● मॉरिशसमध्ये राष्ट्रीय सागरी माहिती केंद्र आणि पोलिस अकादमी स्थापन करण्यासाठी भारताचे सहकार्य
● स्थानिक चलनात परस्पर व्यापार
● मेट्रो एक्स्प्रेस, सर्वोच्च न्यायालयाची इमारत, आरामदायी निवासासाठी सामाजिक गृह आणि ईएनटी रुग्णालय उभारण्यासाठी भारताचे सहकार्य
मुक्त, खुला, संरक्षित आणि सुरक्षित हिंदी महासागर याला भारत आणि मॉरिशसचे समान प्राधान्य आहे. दोन्ही देशांतील सामरिक भागीदारीमध्ये सागरी सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य हे महत्त्वाचे भाग असल्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले आहे. मॉरिशसच्या विशेष आर्थिक क्षेत्रांच्या (ईईझेड) सुरक्षेसाठी पूर्ण सहकार्य देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी मॉरिशसच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड ऑफ द इंडियन ओशन’ असे या पुरस्काराचे नाव आहे. मॉरिशसचे अध्यक्ष धरम गोकुळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने सन्मानित होणारे मोदी हे पहिले भारतीय नेते आहेत.