देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळत आहेत. मात्र, रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता करोना नियंत्रणाबद्दल योगी सरकारचं कौतुक केलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, करोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तरप्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. मी काशीमधल्या माझ्या सहकाऱ्यांचे, शासन- प्रशासनाचे, करोना योद्ध्यांच्या संपूर्ण गटाचे विशेष आभार मानतो. तुम्ही ज्याप्रमाणे दिवस-रात्र झटून व्यवस्था निर्माण केली आहे, ही खूप मोठी सेवा आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संकटं आली. करोना विषाणूच्या बदलणाऱ्या आणि अधिक घातक रुपाने संपूर्ण ताकदीने आपल्यावर हल्ला चढवला. मात्र, काशीसहित संपूर्ण उत्तरप्रदेशने या संकटाशी खंबीरपणे लढा दिला.
कोरोना से निपटने में उत्तर प्रदेश के प्रयास उल्लेखनीय हैं।
मैं काशी के अपने साथियों का, यहां शासन-प्रशासन से लेकर कोरोना योद्धाओं की संपूर्ण टीम का विशेष रूप से आभारी हूं।
आपने दिनरात जुटकर जिस प्रकार काशी में व्यवस्थाएं खड़ी कीं, वो बहुत बड़ी सेवा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 15, 2021
पंतप्रधान पुढे म्हणतात, काशी हे शहर सध्या पूर्वांचलमधील खूप मोठं मेडिकल हब बनत आहे. ज्या आजारांच्या उपाचारासाठी आधी दिल्ली किंवा मुंबईला जावं लागायचं. त्याचे उपचार आता काशीमध्ये उपलब्ध आहेत.
राज्यातल्या महिला सुरक्षेसंदर्भातल्या सुधारणा, भ्रष्टाचारावर आलेलं नियंत्रण, विकास अशा मुद्द्यांवरुनही पंतप्रधानांनी उत्तरप्रदेश सरकारचं कौतुक केलं आहे. ते म्हणतात, काशी आणि उत्तरप्रदेश सरकारने केलेल्या कामांची यादी एवढी लांबलचक आहे की ती लवकर संपतच नाही. जेव्हा वेळ कमी असतो, तेव्हा मला असा प्रश्न पडतो की, उत्तरप्रदेशच्या कोणत्या कामांविषयी सांगू आणि कोणत्या नको.