पीटीआय, नवी दिल्ली
टीका हा लोकशाहीचा आत्मा असल्याचे आपले ठाम मत असून आपल्यावर होणाऱ्या टीकेचे स्वागत करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता अभियंता आणि ‘पॉडकास्टर’ लेक्स फ्रिडमन यांना दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली आणि अनुभवकथन केले. आपले बालपण, हिमालयातील अनुभव, आपल्या जडणघडणीत संघाचे स्थान, पाकिस्तान-ट्रम्प यांच्याबरोबरचे संबंध अशा अनेक विषयांवर त्यांनी यात भाष्य केले.

फ्रिडमन यांचा पंतप्रधान मोदींबरोबरचा तब्बल तीन तासांचा हा ‘पॉडकास्ट’ रविवारी संध्याकाळी प्रसृत करण्यात आला. ‘‘पाकिस्तानबरोबर शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला वैर आणि दगाबाजीने उत्तर मिळाले. इस्लामाबादमध्ये बसलेल्या नेत्यांना शहाणपण येईल आणि ते शांततेचा मार्ग पत्करतील, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानातील जनतेलाही शांतता हवी असल्याची खात्री आहे,’’ असे सांगताना पंतप्रधानांनी २०१४पासून पाकिस्तानबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना उजाळा दिला. आपल्या शपथविधीला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण दिल्याचे मोदी यांनी नमूद केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांवर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले, की आपण व ट्रम्प दोघांनाही अन्य कशाहीपेक्षा आपल्या देशाचे हित महत्त्वाचे वाटते. आपल्या पहिल्या कार्यकाळापेक्षा आता ट्रम्प अधिक तयार असल्याचे जाणवते. कोणती पावले उचलायची हे ट्रम्प यांच्या डोक्यात पक्के असून ते आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

‘विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा’

स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज ही आपली दोन प्रेरणास्थाने असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ‘‘मी जेव्हा स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाचतो तेव्हा मला आश्चर्य वाटते की, ते आयुष्य कसे जगले असतील? एवढे असामान्य जीवन त्यांनी कसे घडवले असेल? हे जाणून घेण्यासाठी मी नेहमी स्वत:वर प्रयोग करतो. यातील बरेचसे प्रयोग हे माझ्या शरीराची क्षमता तपासणारे असतात,’’ असे पंतप्रधानांनी सांगितले.

‘बुद्ध-गांधीजींचा जगाला शांततेचा संदेश’

‘आम्ही जेव्हा-जेव्हा शांततेचा संदेश देतो, तेव्हा जग तो ऐकते’ असे सांगताना पंतप्रधानांनी गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींच्या शिकवणीचे उदाहरण दिले. ‘‘जगात शांतता निर्माण करण्याकरिता भारताचे भूराजकीय महत्त्व आणि क्षमता याबाबत तुम्ही बोलता. रशिया-युक्रेनसारख्या दोन युद्धग्रस्त देशांमध्ये शांततेसाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न कराल?’’ असा प्रश्न फ्रिडमन यांनी विचारला होता. त्यावर पंतप्रधान म्हणाले, की शांततेबाबत आम्ही बोललो की जग ऐकते याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. भारत ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे. आम्ही संघर्षापेक्षा सुसंवादाचे समर्थन करतो. निसर्गाविरुद्ध किंवा एखाद्या राष्ट्राविरुद्ध युद्धाचा आम्ही प्रयत्न करत नाही. जिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थीची गरज असेल, तिथे आम्ही आनंदाने जबाबदारी स्वीकारतो.

जडणघडणीत संघाचे स्थान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जीवनमूल्ये शिकून आपण धन्य झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशासाठी समर्पित भावनेने १९२५पासून संघ काम करीत आहे. संघाने आपल्याला जीवनाचा उद्देश दिला. गुजरातमध्ये घराजवळील ‘शाखे’मधील देशभक्तीपर गीतांनी तरुण वयातच आपल्याला संघटनेकडे आकर्षित केले. संघाइतकी मोठी दुसरी स्वयंसेवी संघटना असल्याचे आपणतरी ऐकलेले नाही, अशा शब्दांत पंतप्रधानांनी संघावर स्तुतिसुमने उधळली.

हिमालयातील अनुभव

आपण आत्मपरीक्षण आणि आत्मशोधासाठी दोन वर्षे हिमालयात भटकंती केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ‘पॉडकास्ट’मध्ये सांगितले. महाकाय हिमालयातील या प्रवासाने आत्मिक शक्ती शोधण्यास आपल्याला सक्षम बनविल्याचे ते म्हणाले. या काळात मला अनेक उल्लेखनीय व्यक्ती भेटल्या. सर्वसंगपरित्याग केलेलेे महान तपस्वी होते. तो काळ हा शिकण्याचा आणि समजून घेण्याचा होता. या अनुभवाने आपल्याला घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पंतप्रधान म्हणाले.

२००२च्या गुजरात दंगलींबाबत चुकीची मांडणी केली केली. नंतर केंद्रात सत्तेत असलेल्या राजकीय विरोधकांची आपल्याला शिक्षा व्हावी, अशी इच्छा होती. मात्र न्यायालयानेही आम्हाला निर्दोष ठरविले आहे. गोध्रा जळीतकांड ही मोठी शोकांतिका होती. या घटनेमुळे ठिणगी पडली आणि हिंसाचार घडला.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान