योगी आदित्यनाथ सरकारने मुस्लीम महिलांविषयीचे गुन्हे रोखण्यासाठी सातत्याने काम केलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. दरम्यान, विरोधी पक्ष मतांसाठी मुस्लीम महिलांच्या प्रगतीच्या मार्गात आडवे आले आहेत, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथं एका प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, तिहेरी तलाकच्या प्रथेवर बंदी घालून भाजप सरकारने मुस्लीम महिलांना न्याय मिळवून दिला आहे. “परंतु जेव्हा विरोधी पक्षांनी आमच्या मुस्लीम भगिनींना मोदींचे कौतुक करताना पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांना थांबवावे लागेल, त्यांना थांबवण्यासाठी, ते त्यांच्या हक्क आणि आकांक्षांच्या मार्गाआड येण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत.”
भाजपा सरकार प्रत्येक पीडित मुस्लीम महिलेच्या पाठीशी उभे असताना, पक्षाचे विरोधक त्यांची दिशाभूल करत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते म्हणाले, “हे लोक मुस्लीम बहिणींना फसवत आहेत जेणेकरून मुस्लीम मुलींचे आयुष्य नेहमीच मागे राहावे. ते पुढे म्हणाले की २०१३ ची मुझफ्फरनगर दंगल तसेच २०१७ मध्ये सहारनपूरमधील हिंसाचार राजकीय आश्रयाखाली लोकांना कसे लक्ष्य केले जाते याचा पुरावा आहे.
विरोधी पक्षांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, “लोकांनी उत्तर प्रदेशचा विकास करणाऱ्यांना मत द्यायचे ठरवले आहे. जे उत्तर प्रदेशाला दंगलमुक्त ठेवतात, जे आमच्या माता-मुलींना भयमुक्त ठेवतात, जे गुन्हेगारांना तुरुंगात ठेवतात, लोक त्यांना मतदान करतील. संपूर्ण परिवारवादी पक्ष खोटी आश्वासने देत आहे. त्यांनी विजेचे आश्वासन दिले होते पण संपूर्ण उत्तर प्रदेशला अंधारात ठेवले होते.”