पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (११ मार्च) सायंकाळी भारतीयांना एक शुभवार्ता दिली. डीआरडीओच्या (संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था) वेज्ञानिकांनी हाती घेतलेली दिव्यास्र मोहीम यशस्वी केली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे. मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मल्टीपल इंडिपेंडन्टली टार्गेटेबल री-एंट्री व्हीकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञानासह पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं अग्नी-५ या क्षेपणास्राची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. मिशन दिव्यास्राच्या यशामुळे आम्हाला आमच्या डीआरडीओमधील वैज्ञानिकांचा अभिमान वाटतो.

डीआरडीओने २०२२ मध्येदेखील भारताच्या शक्तीशाली क्षेपणास्रांची चाचणी केली होती. तेव्हा या क्षेपणास्रांनी ५,५०० किमी दूरपर्यंतचं लक्ष्य यशस्वीपणे उध्वस्त केलं होतं. हे क्षेपणास्र डीआरडीओ आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडने संयुक्तपणे विकसित केलं आहे. या क्षेपणास्रामुळे पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांची संपूर्ण भूमी भारताच्या रडारवर आली आहे.

अग्नी-५ ची वैशिष्ट्ये

भारत सरकारने १९८३ मध्ये Integrated Guided Missile Development Programme (IGMDP) कार्यक्रम हाती घेण्यात आला. यामाध्यमातून जमिनीवरुन हवेत, हवेतून हवेत मारा कऱणारी विविध क्षमतेची क्षेपणास्त्रे ही विकसित करण्याचे निश्चित आले. त्याचाच एक भाग म्हणून अग्नी नावाने विविध लांब पल्ल्यांची क्षेपणास्रे विकसित करण्यात आली. अग्नी-५ हे त्याचं सर्वात शक्तीशाली स्वरुप आहे. हे क्षेपणास्त्र १७.५ मीटर उंच, दोन मीटर व्यास आणि ५० टनापेक्षा जास्त वजनाचे आहे. अग्रभागावर तब्बल तीन टनापर्यंतची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता अग्नी-५ मध्ये आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तब्बल पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर मारा करण्याची हा क्षेपणास्त्राची क्षमता आहे.. जून २०१८ ला हे क्षेपणास्त्र संरक्षण दलात दाखल करण्यात आलं.

हे ही वाचा >> बहुचर्चित ‘CAA’ची अधिसूचना जारी, मोदी सरकारकडून घोषणा

अग्नी ५ च्या मारक क्षमतेमुळे ते आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जातं. म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करण्याची क्षमता यामुळे भारताला मिळाली आहे. हे क्षेपणास्त्र पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जात पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते. या क्षेपणास्त्रामुळे संपूर्ण चीन हा भारताच्या टप्प्यात आला आहे. वेळ पडल्यास ३ टनापर्यंतची स्फोटके किंवा अण्वस्त्रे वाहून नेण्याची अग्नी ५ ची क्षमता आहे. त्यामुळेच अग्नी ५ ला दिव्यास्र किंवा ब्रह्मास्र म्हणून ओळखलं जातं. या क्षेपणास्त्रामुळे शत्रूपक्षावर रणनीति बदलण्याची वेळ आली.

Story img Loader