पीटीआय, नवी दिल्ली
आणीबाणी हे भारतीय इतिहासातील ‘काळे पर्व’ होते, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की लोकशाही समर्थकांवर केलेले अत्याचार आणि त्या काळात त्यांचा ज्या प्रकारे छळ केला गेला, त्याच्या नुसत्या आठवणीने आजही शहारे येतात.नभोवाणीवरील ‘मन की बात’ या मासिक संवाद कार्यक्रमातील १०२ व्या भागातमोदी बोलत होते. भारत ही ‘लोकशाहीची जननी’ आहे, जी लोकशाही मूल्य, आदर्श आणि राज्यघटनेला सर्वोच्च मानते. त्यामुळे २५ जून ही तारीख कधीही विसरता येणार नाही. या दिवशी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणी लागू केली होती. भारताच्या लोकशाही इतिहासातील ही एक मोठी घटना होती. ते एक काळे पर्व होते. लाखो नागरिकांनी आणीबाणीला पूर्ण शक्तिनिशी विरोध केला. मात्र, त्यावेळी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांच्या आठवणी आजही शहारे आणतात. देश जेव्हा ७५ वर्षांवरून स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षांकडे वाटचाल करत आहे, तेव्हा स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या आणीबाणीसारख्या गुन्ह्यांचे अवलोकन करणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण
मोदींनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले. ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासह त्यांचा राज्यकारभार आणि व्यवस्थापन कौशल्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांनी जलव्यवस्थापन आणि नौदलाबाबत केलेले कार्य आजही भारतीय इतिहासाची शान वाढवत आहे. त्यांनी बांधलेले किल्ले इतक्या शतकांनंतरही समुद्रात अभिमानाने उभे आहेत.