पीटीआय, नवी दिल्ली

पाली भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्याने भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान झाला, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काढले. तसेच काँग्रेस सरकारवर टीका करताना, स्वातंत्र्यानंतर भारताच्या सांस्कृतिक वारशाकडे दुर्लक्ष केल्याबद्दलही मोदी यांनी नाराजी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवसानिमित्त राजधानी दिल्लीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, मोठ्या संख्येने भिक्षू, काही मुत्सद्दी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मोदी यांनी या वेळी सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचाही उल्लेख केला. ‘बुद्धांकडून शिका, युद्धापासून दूर राहा आणि शांततेचा मार्ग स्वीकारा’ असे आवाहन मोदी यांनी संपूर्ण जगाला केले. अलीकडेच केंद्र सरकारने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने हा सोहळा आणखीनच खास बनतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>Yahya Sinwar Killed : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार, IDF ने दिला दुजोरा; इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम लागणार?

प्रत्येक राष्ट्र आपला वारसा आपल्या ओळखीशी जोडत असताना, भारत मात्र खूप मागे राहिला आहे. स्वातंत्र्यापूर्वी आक्रमणकर्त्यांनी भारताची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गुलाम मानसिकतेने ग्रस्त असलेल्यांनी नंतर देशाला त्याच्या वारशाच्या विरुद्ध दिशेने नेल्याचा आरोप मोदी यांनी केला.

आमच्या सरकारची धोरणे आणि कार्यक्रम भगवान बुद्धांच्या शिकवणींद्वारे मार्गदर्शित आहेत. अस्थिरता आणि असुरक्षिततेने ग्रासलेले जग त्यांच्या शिकवणीतून समस्यांचे निराकरण करू शकतात, असे मोदी म्हणाले. संपूर्ण जग ‘युद्ध’मध्ये नाही तर बुद्धामध्ये उपाय शोधू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>PM Modi visit Lahore: ‘जेव्हा पंतप्रधान मोदी अचानक धडकले होते पाकिस्तानात’, नवाझ शरीफ यांनी त्या भेटीचा संदर्भ आज का दिला?

बुद्धांच्या शिकवणीतील धडे

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी भगवान बुद्धांच्या शिकवणीतील काही ओळीचा उल्लेख केला. ‘कलह आणि मतभेद शांततेकडे नेत नाहीत आणि शांततेपेक्षा मोठा आनंद दुसरा नाही. प्रत्येकाचे कल्याण हा भगवान बुद्धांचा संदेश आहे.’ बुद्ध हे दोन्ही ‘बुद्ध’ (चेतना) आणि ‘शोध’ (संशोधन) यांचे विषय आहेत. आमचे सरकार या क्षेत्रातील शैक्षणिक आणि संशोधन दोन्हींवर भर देत असल्याचे मोदींनी नमूद केले. संयुक्त राष्ट्र संघात त्यांनी एकदा ‘जगाला युद्ध नव्हे तर भारताने ‘बुद्ध’ दिलाह्ण असे म्हटले होते,’ अशी आठवणही सांगितली.