पीटीआय, भुवनेश्वर
‘भविष्य हे युद्धाचे नसून, बुद्धांचे आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. ‘भारताला लाभलेल्या उत्तम अशा वारशामुळे आज आपण हे सांगू शकतो आहोत,’ असेही ते म्हणाले. भुवनेश्वर येथे १८ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. प्रवासी भारतीय ज्या देशात राहतात, तेथे ते भारताचे राजदूतच असतात, अशा शब्दांत मोदी यांनी प्रवासी भारतीयांचे कौतुक केले.
‘लोकशाही व्यवस्थेचे मातृत्व म्हणजे केवळ भारत नाही, तर येथील नागरिकांच्या जीवनमानाचाच तो एक भाग आहे,’ असे मोदी म्हणाले. जगात आज भारताचा आवाज ऐकला जात असून, केवळ भारत स्वत:ची मते आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडू शकत नाही, तर पूर्ण विकसनशील देशांचाही (ग्लोबल साउथ) आवाज बनला आहे, असे ते म्हणाले. प्रवासी भारतीयांसमोर बोलताना मोदी म्हणाले, ‘साम्राज्यांचा विस्तार जेव्हा तलवारीच्या बळावर होत होता, त्या वेळी सम्राट अशोकाने शांततेचा मार्ग स्वीकारला. भारताच्या वारशाची ही शक्ती आहे. अशा वारशामुळे भारत आज जगाला सांगू शकतो, की भविष्य हे युद्धात नसून, बुद्धामध्ये आहे.
हेही वाचा >>>अफगाणी नागरिकांना व्हिसा सुरू करा! तालिबानची भारताकडे मागणी
‘आम्हाला विविधता शिकवावी लागत नाही. त्यामुळे जगात जिथे कुठे भारतीय जातात, तेथील समाजाचा ते एक भाग होऊन जातात. संबंधित देशाच्या प्रथा, परंपरांचा आम्ही आदर करतो आणि संबंधित देशाची प्रामाणिकपणे सेवा करतो. त्या देशाच्या वाढीसाठी, समृद्धीसाठी योगदान देतात. याच वेळी भारतासाठी आपल्या हृदयाचे ठोकेही वाजत राहतात. अशा प्रवाशांमुळेच मी सगळीकडे मान ताठ ठेवून जाऊ शकतो. जगभरातून मला मिळणारे प्रेम मी विसरू शकत नाही. गेल्या १० वर्षांत जगभरातील अनेक नेत्यांना भेटलो. सर्वांनी भारतीय समुदायाचे कौतुक केले. संबंधित देशात जी सामाजिक मूल्ये तुम्ही घेऊन जाता, त्यामुळे हे कौतुक होते. मी सर्वांचे आभार मानतो,’ असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले…
● प्रवासी भारतीयांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची. ती आमची जबाबदारी. गेल्या १० वर्षांत विविध देशांतील दूतावास अधिक सक्रिय
● गेल्या दोन वर्षांत १४ दूतावास आणि वकिलाती विविध ठिकाणी सुरू झाल्या.
● भारतीय समुदायाने स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता २०४७ मध्ये विकसित भारत होण्यासाठी त्यांनी मदत करावी.
● भारताच्या खऱ्या इतिहासाचा भारतीय समुदायाने प्रसार करावा.
● प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याला सर्वांनी यावे.