धानाच्या भावात किरकोळ वृद्धी; डाळी, तेलबिया उत्पादकांना मोठा लाभ

यंदा १४ खरीप पिकांचे किमान हमीभाव क्विंटलमागे ७२ ते ४२५ रुपयांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारने बुधवारी केली. धानाच्या हमीभावात क्विंटलमागे ७२ रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आली असून; डाळी, तेलबिया व तृणधान्ये यांच्या हमीभावात भरीव वाढ करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या काही आठवड्यांत मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसोबत पेरणीला वेग येणार असताना सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

२०२१-२२ पीक वर्षासाठी (जुलै-जून) १४ खरीप पिकांच्या किमान हमीभावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० ते ८५ टक्के अधिक फायदा मिळू शकेल, असे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

काही महिन्यांपूर्वी संसदेने नवे कृषी कायदे मंजूर केल्यानंतर किमान हमीभावाबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. त्यावेळी, हमीभावाचे धोरण कायम असून, भविष्यातही कायम राहील असे आश्वासन पंतप्रधान आणि मीदेखील दिले होते, याकडे तोमर यांनी लक्ष वेधले. त्यामुळे शेतमालाच्या किमान हमीभावाबाबत भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. किमान हमीभाव वाढवण्यात येत असून, यापुढेही अशी वाढ करण्यात येईल, असे कृषीमंत्री म्हणाले.

Story img Loader