संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात भारताला भरीव मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गुरुवारी येथे झालेल्या शिखर परिषदेत अमेरिकेकडून देण्यात आले. दोन्ही देशांतील व्यापार वाढवणे, दहशतवादविरोधी लढा आणि कृत्रिम प्रज्ञा अशा क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याबद्दलही मतैक्य झाले.

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर ट्रम्प यांची भेट घेणारे मोदी हे पहिलेच प्रमुख जागतिक नेते ठरले. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळांपासून स्नेहभाव आहे आणि याची प्रचीती या दोहोंच्या सौहार्दपूर्ण भेटी-गाठींमधून आली. परस्पर मैत्रीचे पर्व प्रदीर्घ करण्यावर यात भर देण्यात आला. मात्र, मोदी भेटीआधी आणि भेटीदरम्यानही ट्रम्प यांनी भारताबरोबर ‘रेसिप्रोकल टॅरिफ’चा (परस्परसमान व्यापार शुल्क) स्पष्ट उल्लेख केला आणि याबाबत कोणतीही मैत्रीपूर्ण तडजोड नसल्याचे पुरेसे स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमधील ओव्हल कार्यालयात हस्तांदोलन आणि गळाभेट घेऊन स्वागत केले. मोदींचा उल्लेख त्यांनी महान मित्र आणि उत्कृष्ट व्यक्ती म्हणून उल्लेख केला. दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात दोन्ही देश लवकरच मोठा व्यापारी करार करण्याच्या तयारीत असल्याचे ट्रम्प म्हणाले. त्याच वेळी भारताने अमेरिकेच्या काही वस्तूंवर लावलेले आयात शुल्क अतिशय अन्यायकारक आणि जास्त असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. मोदी यांच्याबरोबर चर्चा होण्याच्या काही तास आधीच ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्व व्यापारी भागीदारी देशांबरोबर परस्परसमान कर धोरणावर स्वाक्षरी केली, हे विशेष.

अदानींवर चर्चा नाही

गौतम अदानींचा मुद्दा चर्चेत निघाला का, या प्रश्नावर मोदी म्हणाले, ‘भारत लोकशाहीवादी देश आहे आणि आमची संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशी आहे. आम्ही सारे जग एक कुटुंब मानतो. प्रत्येक भारतीय माझा आहे, यावर मी विश्वास ठेवतो. अशा वैयक्तिक बाबींवर दोन देशांतील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होत नाही.’

ऊर्जा आणि संरक्षण

ट्रम्प म्हणाले, ‘भारताला तेल आणि नैसर्गिक वायूपुरवठा करणाऱ्या देशांमध्ये अमेरिकेचा क्रमांक पहिला असेल. भारताबरोबरील व्यापारी तूट कमी करण्यासाठीचा हा उपाय असेल. ही तूट ४५ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. पंतप्रधान मोदी आणि माझ्यामध्ये यावर एकमत झाले आहे. संरक्षण सहकार्य वाढविण्याचाही निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. या वर्षापासून भारताला लष्करी साहित्याची विक्री अनेक अब्ज डॉलरनी आम्ही वाढवू. उच्च प्रहारक्षमतेचे आणि अत्याधुनिक ‘एफ-३५ स्टेल्थ’ लढाऊ विमान भारताला देण्याचा मार्ग आम्ही मोकळा करीत आहोत.’

स्थलांतरितांना वागणुकीवर मौन

बेकायदा स्थलांतरितांना भारताचा नेहमीच विरोध राहिला. कोणत्याही देशामध्ये भारताचे नागरिक अवैधरीत्या राहात असतील, तर ते योग्य नाही. त्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी आम्ही पावले उचलू, असे मोदी म्हणाले. मात्र मध्यंतरी अमेरिकेतील बेकायदा भारतीयांच्या अनमानजनक पाठवणीविषयी त्यांनी वक्तव्य केले नाही.

‘भारत शांततेच्या बाजूने’

युक्रेन युद्धाबाबत भारताची भूमिका तटस्थ नसल्याचे सांगताना मोदी म्हणाले, ‘युद्ध (युक्रेन) संपण्यासाठी ट्रम्प प्रयत्न करीत आहेत, त्याला माझा पाठिंबा आहे. या युद्धाबाबत भारताची भूमिका तटस्थ आहे, असे जगाला वाटते. मात्र, भारताची भूमिका तटस्थ नसून, भारत शांततेच्या बाजूने आहे. मी पुतिन यांना भेटलो, त्या वेळी हा काळ युद्धाचा नाही, असे मी म्हणालोही होतो. समस्यांवर उपाय युद्धभूमीत सापडत नाहीत, सर्व पक्षकार चर्चेच्या टेबलावर येतात, तेव्हाच उपाय सापडतात, असेही मी म्हणालो होतो.’

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणास मंजुरी

जगभरातील कट्टरतावादी इस्लामिक दहशतवादाचा सामना करण्यासाठी आतापर्यंत कधीही केले नाही, इतके काम भारत आणि अमेरिका एकत्रित यापुढे करतील, असे सांगतानाच ट्रम्प म्हणाले, ‘माझ्या प्रशासनाने जगातील सर्वांत वाईट अशा एका व्यक्तीच्या प्रत्यार्पणास परवानगी दिली आहे. भारतामध्ये त्याचा न्याय होईल. याखेरीज आणखीही काही आरोपींच्या हस्तांतरास आम्ही मंजुरी देणार आहोत.’ ट्रम्प यांनी मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचा उल्लेख केला. राणा सध्या लॉस एंजेलिसमधील ताबाकेंद्रात आहे. दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या पाकिस्तानी अमेरिकी डेव्हिड कोलमन हेडली याच्याबरोबर राणा असल्याचे मानले जाते.

‘संरक्षण क्षेत्रातील सहकार्याची चौकट पुढील दशकासाठी तयार केली जाईल. ट्रम्प यांच्याकडून एक चांगली बाब मी शिकलो. ती म्हणजे, ते राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य देतात. मीदेखील भारताच्या राष्ट्रहिताला इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा सर्वोच्च प्राधान्य देईन.’ – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘व्यापारी तूट कमी करण्यासाठी भारत अमेरिकेकडून तेल, नैसर्गिक वायू आणि एफ-३५ लढाऊ विमानांसह लष्करी सामग्री अधिकाधिक प्रमाणात खरेदी करेल; मात्र भारत अमेरिकी वस्तूंवर जितके शुल्क आकारतो, तितकेच शुल्क भारताच्या वस्तूंवर येथे आकारले जाईल. – डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

पत्रपरिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

●भारत-पश्चिम आशिया-युरोप महामार्गाबाबत मतैक्य. एकत्रितपणे ‘महान व्यापारी मार्ग’ उभारण्याचा विश्वास

●पूर्व लडाखमधील चीनबरोबरील संघर्ष वाईट असल्याची ट्रम्प यांची टिप्पणी. चीन, रशिया, भारत, अमेरिका यांच्याशी संबंध चांगले राहावे

●भारतीय बाजारपेठेत अमेरिकी अणुतंत्रज्ञानाचे स्वागत करण्यासाठी कायद्यात सुधारणा करणार असल्याने ट्रम्प यांच्याकडून स्वागत

Story img Loader