मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातला आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वीचा आजचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने शेवटचा अर्थसंकल्प होता. तेव्हा अर्थसंकल्पात किती मोठ्या घोषणा केल्या जातात, काय विशेष तरतुदी केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अर्थसंकल्प सादर झाल्यावर एकीकडे शेयर बाजारात आलेली तेजी, बदललेल्या प्राप्तिकर कर रचनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया असं वातावारण असतांना पंतप्रधान मोदी यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींचे जोरदार समर्थन केलं आहे.
“समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ही देशाच्या मध्यमवर्गात आहे. युवा वर्ग ही जशी भारताची ताकद आहे तसा मध्यमवर्ग ही जमेची बाजू आहे. या वर्गाला सक्षम बनवण्यासाठी आम्ही अनेक निर्णय हे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेतले आहेत. प्राप्तिकर रचना अधिक पारदर्शक केल्यामुळे आता मध्यमवर्गाला आणखी दिलासा मिळणार आहे ” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे.
१२ बलुतेदारांना तसंच ग्रामीण अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकाला अनेक प्रोत्साहपर योजना या अर्थसंकल्पात आहेत. यामुळे कोट्यावधी लोकांना याचा फायदा होणार आहे, सहकारी क्षेत्रासाठी विविध योजना आजच्या अर्थसंकल्पात आहेत, शेती आणि मत्स व्यवसाय जोमाने वाढेल यासाठी विविध तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत अशी प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा… इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन, टीव्ही; नेमकं काय स्वस्त होणार? अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
शहरी आणि ग्रामीण भागातील महिला वर्गाला सक्षम बनवण्याची पावले या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उचलण्यात आलेली आहेत. हरित उर्जेशी संबंधित मोठा विस्तार यापुढच्या काळात होणार आहे. २०१४ नंतर ४०० टक्के एवढी वाढ ही सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी असलेल्या तरतुदींमध्ये अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यावेळी पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांची अभूतपूर्व तरतूद केल्यामुळे आता भारताच्या विकासाला गती येणार असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले.