लोकसभा निवडणुकीत छडी घेऊन यूपीए सरकारच्या मागे लागलेल्या मोदी गुरूजींनी शुक्रवारी देशातील विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेमळ आणि खेळीमेळीच्या वातावरणात ‘दशपाठ’ शिकवले. शिक्षकदिनानिमित्ताने देशभरातील विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याचा, वाचन करण्याचा, तंत्रज्ञानाने अवगत होण्याचा सल्ला दिलाच; शिवाय येत्या काळात आपल्या सरकारचा प्रमुख मुलींच्या शिक्षणावर असेल, असेही जाहीर केले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी पंतप्रधानांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मोदींचे भाषण ऐकण्याची सक्ती, त्यावरून निर्माण झालेले वादंग या पाश्र्वभूमीवर झालेला हा पंतप्रधान-विद्यार्थी संवाद मात्र चांगलाच रंगला. नवी दिल्ली येथील माणेकशॉ सभागृहात पंतप्रधानांनी सुमारे अर्धा तास विद्यार्थ्यांना संबोधून भाषण केले. त्यात त्यांनी मुलांना वाचन, शिक्षण, खेळ, स्वच्छता अशा अनेक गोष्टींचे महत्त्व पटवून दिले. देशात सध्या शिक्षकांचा तुटवडा आहे. शिक्षण ही एक अशी चळवळ झाली पाहिजे की त्यामुळे ही परिस्थिती बदलून आपल्याला जगभर शिक्षक निर्यात करता आले पाहिजे, असे मोदी म्हणाले.
मुलींच्या शिक्षणावर भर
अधिकाधिक मुलींनी शिक्षण घ्यावे याला आपले सरकार प्राधान्य देत असल्याचे मोदी म्हणाले. शालेय शिक्षण सोडून देण्याचे मुलींचे प्रमाण कमी व्हावे यासाठी घराजवळच शाळा सुरू करण्याची सरकारची योजना असून त्या संदर्भात सर्व राज्य सरकारांशी चर्चा सुरू असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. देशभरातील सर्व शाळांमध्ये मुलींसाठी प्रसाधनगृहे उभारण्याच्या योजनेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
मी टास्कमास्टर
मोदींनी स्वत:चे वर्णन ‘टास्कमास्टर’ असे केले. कोणत्याही कामात झोकून देणे हा आपला स्वभाव असून इतरांनाही त्याच पद्धतीने काम करण्यासाठी प्रेरित करतो, असे मोदींनी स्पष्ट केले.
“सर्व सुशिक्षित, डॉक्टर-अभियंते, नोकरशहा यांनी आठवडाभरात किमान एक तास तरी आपल्या नजीकच्या शाळेत जाऊन मुलांना शिकवावे. त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व वृद्धिंगत तर होईलच, शिवाय शिक्षण ही एक जनचळवळ म्हणून पुढे येईल व राष्ट्र उभारणीसाठी त्याचा उपयोग होईल.”
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा