एपी, मिलान : इटलीचे तीनदा पंतप्रधानपद भूषवलेले दिवंगत ज्येष्ठ नेते सिल्विओ बर्लुस्कोनी यांच्या पार्थिवावर बुधवारी येथील गॉथिक शैलीच्या डय़ुओमो कॅथ्रेडलमध्ये सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यानिमित्त राष्ट्रीय शोकदिन पाळण्यात येत आहे. बर्लुस्कोनी यांचे सोमवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. इटलीच्या या वादग्रस्त नेत्याचा वारसा सकारात्मक की नकारात्मक याबाबत त्यांच्या समर्थक-विरोधकांत टोकाची मतांतरे आहेत. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा पाळण्यासही काहींनी विरोध केला आहे.
बर्लुस्कोनी हे माध्यम सम्राट, फुटबॉल व्यावसायिक आणि इटलीचे तीनदा पंतप्रधानपद भूषवलेले असे अलिकडच्या दशकांतील इटलीतील प्रभावी व्यक्तिमत्त्व होते, असे इटलीच्या बहुसंख्य नागरिकांचे मत आहे. मात्र, बर्लुस्कोनी यांचा हा प्रभाव चांगला होता की वाईट होता, याबाबत त्यांच्यात मतांतरे आहेत. सर्व दिवंगत माजी पंतप्रधानांप्रमाणे बर्लुस्कोनी यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निर्णयासह यानिमित्त राष्ट्रीय शोकदिन घोषित केल्याबद्दल विरोधक सवाल उपस्थित करत आहेत. इटलीत असा शोकदिन क्वचितच पाळला जातो. अशा नेत्यांच्या निधनानंतर शोकदिनाऐवजी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो.
बर्लुस्कोनी यांच्यावर गेली तीस वर्षे सातत्याने टीका करणारे पत्रकार मार्को ट्रॅव्हॅग्लिओ यांनी खासगी वाहिनी ‘ला ७’ शी सोमवारी बोलताना सांगितले, की बर्लुस्कोनी यांनी इटलीचे विभाजन केले. त्यांनी गेली ३० वर्षे आपल्या विरोधकांचा सातत्याने अपमान केला. न्यायव्यवस्थेचे गुन्हेगारीकरण केले. कायद्यांना जुमानले नाही. त्यामुळे आपण त्यांच्याविषयी काय बोलावे?
बर्लुस्कोनी यांची दीर्घ कारकीर्द वादग्रस्तही राहिली. त्यांच्या माध्यम साम्राज्याशी संबंधित हितसंबंधांचा संघर्ष, मुख्यत: व्यावसायिक व्यवहारांसंदर्भातील अनेक खटले, मिलानजवळील त्याच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या वादग्रस्त कामुक उत्सवी मेजवान्या, रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह अनेकांशी असलेले त्यांचे वादग्रस्त मैत्रीसंबंध कायम चर्चेत राहिले. तरीही, मिलानमध्ये अंत्यसंस्कार स्थळाच्या बाहेर हजारो इटालियन नागरिक उपस्थित होते.
बर्लुस्कोनी यांच्यावर गेली तीस वर्षे सातत्याने टीका करणारे पत्रकार आणि दैनिक इल फाट्टो कोटिडियानोचे सह संस्थापक मार्को ट्रॅव्हॅग्लिओ यांनी खासगी वाहिनी ‘ला ७’ शी सोमवारी बोलताना सांगितले, की बर्लुस्कोनी यांनी इटलीचे विभाजन केले. त्यांनी गेली ३० वर्षे आपल्या विरोधकांचा सातत्याने अपमान केला. न्यायव्यवस्थेचे गुन्हेगारीकरण केले. कायद्यांना जुमानले नाही. त्यामुळे आपण त्यांच्याविषयी काय बोलावे?