रेल्वे अर्थसंकल्पात दुर्लक्ष झालेल्या महाराष्ट्रातील प्रकल्पांना मार्गी लावण्याच्या मुद्दय़ावर रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल तसेच रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्याचे आश्वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी दिले. पवार यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राच्या खासदारांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन नुकत्याच मांडण्यात आलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रार केली. या वेळी प्रत्येक खासदाराने आपापल्या मतदारसंघात रेल्वे खातेविषयक मागण्या पंतप्रधानांपुढे मांडल्या. रेल्वेला देशातला सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून मिळत असूनही राज्याला उपेक्षित ठेवण्यात आल्याबद्दल खासदारांनी खेद व्यक्त केला. रेल्वेमंत्री बन्सल तसेच रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक बोलावून महाराष्ट्रासाठी निश्चितपणे फेरविचार करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी या वेळी दिले. शिष्टमंडळात तारीक अन्वर, सुप्रिया सुळे, डी. पी. त्रिपाठी, समीर भुजबळ, ए. टी. नाना पाटील, हरीभाऊ जावळे, हरिश्चंद्र चव्हाण, संजय धोत्रे, हंसराज अहिर, दत्ता मेघे, संजीव नाईक, संजय पाटील, भावना गवळी, भाऊसाहेब वाकचौरे आदी खासदार सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा