नवी दिल्ली : मतदारांनी काँग्रेसला सातत्याने नाकारले असून देशाची प्रगती बघून विरोधक आणखी निराश झाले आहेत. आपल्यावर खोटे आरोप आणि शिव्याशाप देऊन निराशेतून मार्ग निघेल असे त्यांना वाटते. मात्र १४० कोटी देशवासीयांचा विश्वास हीच आपली ढाल आहे, असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
अभिभाषणाच्या आभार प्रस्तावादरम्यान बोलताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना लक्ष्य केले होते. यावर पंतप्रधानांनी कोणतेही थेट भाष्य केले नाही. त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळातील अपयशांचा पाढा वाचला. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची २०१४-१४ ही दहा वर्षे म्हणजे वाया गेलेले दशक होते. प्रत्येक संधीचे संकटात रुपांतर करणे हेच काँग्रेस सरकारचे व्यवच्छेदक लक्षण होते. आत्ताचे दशक मात्र भारताचे आहे, जगभरात देशाचे यश मिरवण्याचे आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. देशात ‘२ जी’, ‘कॅश फॉर व्होट’, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचार, कोळसा घोटाळा अशी अनेक प्रकरणे झाली. भ्रष्टाचार घोटाळा झाला. २००८ मध्ये झालेला दहशतवादी हल्ला कोणीही विसरू शकणार नाही. कन्याकुमारीपासून काश्मीपर्यंत देशभर दहशतवादी हल्ले झाले. पण, प्रत्युत्तर देण्याची हिंमत काँग्रेस सरकारमध्ये नव्हती, अशी टीका मोदींनी केली.
राहुल गांधींवर हल्लाबोल
सभागृहात काल (राहुल गांधींचे) भाषण होत असताना विरोधी बाकांवर आनंदाच्या उकळय़ा फुटत होत्या. काही इतके खूश झाले आणि गाढ झोपले की, त्यांना सकाळी जागच आली नाही आणि ते आज आले नाहीत, असा टोला मोदींनी लगावला. मोदींच्या भाषणावेळी राहुल गांधी मात्र सभागृहात उपस्थित होते. काही लोक आरोप करतात की, २०१४ पासून देश कमकुवत झाला, जगात भारताला कोणी विचारत नाही. हेच लोक म्हणतात की, दुसऱ्या देशावर दबाव आणून सरकार धोरणे ठरवते. सरकारवर आरोप करणाऱ्यांनी देश कमकुवत की मजबूत झाला हे ठरवावे, असा सल्लाही मोदी यांनी दिला.
‘विरोधकांना प्रगती बघवत नाही’
करोना, युद्ध आणि विभागले जग अशी अनेक आव्हाने असतानाही भारत आत्मविश्वासाने पुढे निघाला आहे. जगभरात महागाई, बेरोजगारीची चिंता असताना भारत पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आता देशात राजकीय स्थैर्य निर्माण झाले असून ठोस निर्णय घेणारे सरकार सत्तेवर आले आहे. ‘डिजिटल इंडिया’चे जगाला कुतुहल आहे. भारत जागतिक उत्पादनकेंद्र बनू लागला आहे. ही प्रगती विरोधकांना बघवत नाही, असा आरोप पंतप्रधानांनी केला.
‘देशासाठी आयुष्य वेचले’
मी टीव्ही आणि वृत्तपत्रांच्या आधारे देशवासीयांचा विश्वास मिळवलेला नाही. देशासाठी आयुष्य वेचले आहे. मोफत धान्य योजनेचा लाभ घेणारे ८० कोटी देशवासी विरोधकांच्या शिव्यांवर विश्वास ठेवतील का? वंचित, दलित आदिवासी अशा समाजातील सर्वासाठी विकासाच्या योजना पोहोचवल्या जात आहेत. संकटाच्या वेळी मोदी मदतीला आले, हे लोकांना माहिती आहे, असे मोदी म्हणाले.
काँग्रेसने मध्यमवर्गाला नाकारले
काँग्रेसने फक्त मतांचे राजकारण केल्यामुळे देशाच्या विकासाला, सामर्थ्यांला धक्का लागला. मध्यमवर्गाकडे दुर्लक्ष केले. आता मध्यमवर्गाला इमानदारीचे फळ मिळू लागले आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. गृहकर्ज मिळू लागले आहे, ‘रेरा’मुळे घर मिळण्याची शाश्वती आहे, शिक्षणाच्या संधी मिळत आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
लालचौकातील तिरंग्यावरून टोले
श्रीनगरमध्ये लालचौकात तिरंगा फडकवण्याो दहशतवाद्यांचे आव्हान मी जम्मूच्या जाहीरसभेत स्वीकारले आणि कुठल्याही सुरक्षेविना, बुलेटप्रूफ जाकीटविना लालचौकात तिरंगा फडकावला. केंद्राच्या धोरणांमुळे काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आता लालचौकात तिरंगा फडकवला जात असल्याचा टोला मोदी यांनी लगावला. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेची श्रीनगरमध्ये सांगता करताना राहुल गांधींनी लालचौकात तिरंगा फडकवला होता.
भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली म्हणून सक्तवसुली संचालनालयावर (ईडी) विरोधकांनी आरोप केले. मतदारांनी विरोधकांना नाकारले, त्यांना एका मंचावर आणले नाही. पण, ‘ईडी’विरोधात विरोधक एकत्र झाले आहेत. त्यांनी ‘ईडी’चे आभार मानले पाहिजेत.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
अदानींची पाठराखण – राहुल गांधी
‘हिंडेनबर्ग रिसर्च’ संस्थेच्या अहवालाबाबत चौकशीचे आदेश न देणारे पंतप्रधान अदानींचा बचाव करत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी बुधवारी केला. आपण विचारलेल्या एकाही प्रश्नाला पंतप्रधानांनी उत्तर दिले नाही. पंतप्रधानांच्या भाषणामुळे मी समाधानी नाही, मात्र त्यामुळे सत्य उघड झाले आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
राहुल गांधींवर हक्कभंगाची मागणी
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींविरोधात हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांबाबत बेजबाबदार आणि बेछूट विधाने केली आहेत. ही विधाने विपर्यास करणारी, अवमानजनक, असंसदीय तसेच पंतप्रधान मोदी आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी आहेत, असा आरोप दुबे यांनी केला.
भाषणातील वाक्ये हटविली
राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत केलेल्या भाषणातील १८ वाक्ये अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाजातून काढून टाकली. यात प्रामुख्याने मोदी आणि अदानी यांच्यावर केलेले भाष्य हटविण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच राहुल गांधी यांनी आपले भाषण समाजमाध्यमांवर टाकत ‘लोकशाहीचा आवाज हटविला जाऊ शकत नाही,’ असा टोला लगावला.
विरोधकांची घोषणाबाजी आणि सभात्याग
मोदींनी भाषणात एकदाही अदानी समूहाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे मोदींच्या वाक्यागणिक विरोधक ‘अदानी.. अदानी..’ अशा घोषणा देत होते. मोदींनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर काही खासदारांनी सभात्याग केला. भारत राष्ट्र समितीच्या सदस्यांनी, अदानी प्रकरणावर संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी मान्य होत नसल्याचे कारण देत सभात्याग केला. राज्यसभेतही भारत राष्ट्र समिती, आम आदमी पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांनी सभात्याग केला.