पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यांत अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या राजवटीत डॉ. सिंग हे दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री विल्यम बर्न्स गेल्या आठवडय़ात भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी ओबामा यांच्या वतीने पंतप्रधानांना निमंत्रण दिले. सप्टेंबर महिन्यांत संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान न्यूयॉर्कला जाणार असून त्यावेळीच ते वॉशिंग्टनलाही भेट देतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
पुढील आठवडय़ात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी भारतभेटीवर येणार असून त्यावेळी पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याच्या कार्यक्रमाची निश्चितपणे आखणी होईल. नोव्हेंबर २००९९ मध्ये पंतप्रधान अमेरिकेच्या भेटीवर आले होते तेव्हा त्यांनी परस्पर संबंधाबाबत पावले उचलली होती. मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांनी दहशतवादाचा मुकाबला करण्याबाबत सहकार्य करण्याच्या करारावर सह्य़ा केल्या होत्या.
भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे यासाठी बराक ओबामा यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा