भारताच्या दृष्टीने कळीच्या ठरणाऱ्या मुद्दय़ावर पाकिस्तानकडून जोपर्यंत कोणताही ठाम प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत भारतीय पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग पाकिस्तानचा दौरा करणार नाहीत, असे केंद्र सरकारमधील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
सन २०१० मध्ये भरताचे तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनी पाकिस्तानला एक यादी दिली होती. भारताच्या पाकिस्तानकडून असलेल्या ‘अपेक्षा’ त्यामध्ये व्यक्त करण्यात आल्या होत्या. या मागण्यांना पाक सरकारने ठोस असा प्रतिसाद अजूनही दिलेला नाही. जोपर्यंत पाक सरकार अपेक्षित प्रतिसाद देत नाही तोपर्यंत भारतीय पंतप्रधान पाकिस्तानास भेट देणार नाहीत, मग भले पकिस्तानची ही भेट व्हावी अशी कितीही इच्छा असो, असे स्पष्ट करण्यात आले.
२६/११ च्या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला फाशी दिली म्हणजे दहशतवाद विरोधी लढाईचा किंवा २६/११ प्रकरणाचा अंत झाला असे भारताला वाटत नाही. जोपर्यंत २६/११च्या हल्ल्यामागील कर्त्यांकरवित्यांना पाक सरकार शासन करीत नाही तोपर्यंत, भारत-पाक संबंधात मोकळेपणा येवू शकत नाही हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे, असेही या सरकारी सूत्रांतर्फे सांगण्यात आले.   

Story img Loader