रेल्वे खात्यात होणाऱ्या वाढत्या भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. रेल्वे खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पंतप्रधानांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेबाबतच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. त्यावर पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशातून येणाऱ्या तक्रारींसाठी एकच टेलिफोन लाइन असावी अशी सूचना पंतप्रधानांनी दिली आहे. हीच लाइन लोकांच्या समस्यांचे निराकरण करेल तसेच आपतकालीन स्थिती मध्येही लोकांचे सहकार्य करेल असे पंतप्रधानांनी म्हटले. पंतप्रधानांनी रेल्वे, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बहुतांश तक्रारी या भ्रष्टाचारासंबंधी असल्याचे ते म्हणाले. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा असा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मिर ईशान्य भारतातील राज्ये या भागातील प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला. मुंबई मेट्रो, तिरुपती-चेन्नई महामार्ग, उत्तर प्रदेशातील प्रकल्पांचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. या व्यतिरिक्त लहान मुलांच्या लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या इंद्रधनुष्य या मोहिमेचा त्यांनी आढावा घेतला. लसीकरणाच्या बाबतीत मागास असलेल्या १०० जिल्ह्यांची यादी करावी असे त्यांनी सांगितले.

नॅशनल कॅडेट कॉर्प्स आणि नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांची या कामी मदत घ्यावी असे ते म्हणाले. २०१९ मध्ये महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे. स्वच्छ भारत मिशनची जास्तीत जास्त कामे २०१९ पर्यंत व्हायला हवी अशी सूचना पंतप्रधानांनी दिली. २०२२ मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. त्याआधी राज्यातील आणि केंद्रातील सचिवांनी, अधिकाऱ्यांनी विकासासाठी जास्तीत जास्त संकल्पना मांडाव्यात असे पंतप्रधानांनी म्हटले. २०२२ पर्यंत देशामध्ये अभूतपूर्व बदल घडवण्याच्या दृष्टीतून या संकल्पनांकडे पहा असे ते म्हणाले. या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा असे पंतप्रधानांनी सांगितले. भ्रष्टाचार मुक्त प्रशासनसाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे तेव्हा कोणत्याही खात्यातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime narendra modi railway department suresh prabhu complaints about corruption