पाटण्यातील साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित तारिक याचा गुरुवारी रात्री उशीरा मृ्त्यू झाला. तारिक हा पाटणा रेल्वे स्थानकात झालेल्या बॉम्बस्फोटात जखमी झाला होता. तेथून पळून जात असताना पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याच्यावर पाटण्यातील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते.
तारिक याच्या डोक्यामध्ये धातूकण घुसले होते. ते बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. मात्र, स्फोटात जखमी झालेल्या तारिकची प्रकृती नाजूक असल्याने त्याच्यावर लगेचच उपचार करणे शक्य नव्हते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.
पाटण्यातील गांधी मैदानावर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची गेल्या रविवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या ठिकाणी कमी तीव्रतेचे सहा बॉम्बस्फोट झाले. त्याच्याआधी पाटणा रेल्वेस्थानकावर स्फोट झाला होता. तारीकनेच या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा पोलीसांचा संशय आहे. तारिकजवळ मिळालेल्या मोबाईलमधून काही टेलिफोन क्रमांक मिळाले आहेत. त्याचबरोबर त्याच्याकडून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत, असे पोलीसांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा