Japanese Prince Hisahito of Akishino: जपानच्या राजेशाही घराण्यातील राजकुमार हिसाहितो हा शुक्रवारी १८ वर्षांचा झाला. मागच्या ४० वर्षांत या घराण्यात १८ वर्षांचा टप्पा गाठणारी हिसाहितो ही पहिलीच व्यक्ती आहे. जपानमध्ये तब्बल हजार वर्ष राज्य केलेल्या या राजेशाही घराण्यासाठी ही खूप मोठी बाब मानली जाते. जपानप्रमाणेच या कुटुंबालाही वृद्धत्व आणि कुटुंबात कमी होत चाललेल्या सदस्य संख्यांच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ५८ वर्षीय राजकुमार फुमिहितो आणि त्यांची पत्नी राजकुमारी किको (५७ वर्षीय) यांचा हिसाहितो हा एकमेव मुलगा आहे.

हिसाहितो हाही एकेदिवशी जपानचा सम्राट बनणार असल्याचे सांगितले जाते. विद्यमान सम्राट नारुहितो यांचा तो भाचा आहे. मुकुटधारी राजकुमार अकिशिनो यांनी १९८५ साली १८ वर्षांचा टप्पा गाठला होता. शाही कुटुंबात प्रौढत्व प्राप्त करणारे ते शेवटचे पुरूष होते. १७ सदस्यांच्या या शाही कुटुंबात हिसाहितो हे सर्वात लहान आहेत. या कुटुंबात केवळ चार पुरुष आहेत.

हे वाचा >> जपानच्या खेळाडूने व्हीलचेअर टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर केले अनोखे सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल

हिसाहितो हा शेवटचा पुरूष या शाही घराण्यात उरल्यामुळे त्याच्याकडे शेवटचा वारस म्हणून पाहिले जाते. जपानच्या व्यवस्थेसाठी ही मोठी चिंतेची बाब असल्याचे मानले जाते. त्यामुळेच कुटुंबातील महिलांवर विसंबून न राहता गादीवर एखादा पुरूषच कसा बसेल, यावर अनेकदा वाद घातले गेले आहेत. जपानमध्ये १९४७ साली दुसऱ्या महायुद्धानंतर इम्पीरियल हाऊस कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार जपान युद्धपूर्व काळातील पुराणमतवादी विचार जोपासतो. या कायद्यानुसार केवळ पुरुषांनाच गादीवर बसण्याची परवानगी आहे. तसेच कुटुंबातील एखाद्या महिलेने शाही कुटुंबाबाहेरील व्यक्तीशी लग्न केल्यास, तिला शाही घराण्यातून बेदखल करण्यात येते.

विद्यमान सम्राट नारुहितो आणि त्यांची पत्न मासाको यांना राजकुमारी आयको ही एकच मुलगी आहे. राणी मासोका या हार्वर्डमधून शिक्षण घेतलेल्या आणि माजी मुत्सद्दी अधिकारी आहेत. जपानची सामान्य जनता त्यांनाच पुढचा सम्राट म्हणून पसंती देते. पण कायदा महिलेला गादीवर बसण्याची परवानगी देत नाही. मासाको या थेट राजेशाही वंशातील असूनही त्यांना सम्राट बनण्यात कायद्याचा अडसर आहे.

Japans Emperor Naruhito, from left Empress Masako and their daughter Princess Aiko
विद्यमान सम्राट नारुहितो, त्यांची पत्नी राणी मासाको आणि मुलगी राजकुमारी आयको (Photo via AP)

हिसाहितो यांनी बुधवारी जपानमधील माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी सध्यातरी माझ्या शालेय जीवनावर लक्ष केंद्रीत करत आहे.

जपानच्या सरकारने २०२२ साली तज्ज्ञांची समिती स्थापन करून राजघराण्यातील घटत्या सदस्य संख्येवर उपाय सुचावण्यास सांगितले होते. समितीने शिफारस केली की, राजघराण्यातील घटती सदस्यसंख्या रोखण्यासाठी महिला सदस्यांना विवाहानंतरही राजेशाही दर्जा राखण्याची परवानगी द्यावी. तसेच राजेशाही घराण्यातून बाहेर गेलेल्या कुटुंबातीलच एखादा पुरूष वंशज दत्तक घेऊन गादीवर बसवावे.

समीक्षकांच्या मते, जोपर्यंत राजघराण्यात पुरूषाकडून पुरूषाकडेच उत्तराधिकार सोपविण्याची पद्धत आहे. तोपर्यंत कोणत्याही उपायांचा परिणाम मर्यादितच राहित. आधुनिक युगाच्या पूर्वी हे शक्य होते. कारण त्यावेळी एकाहून अधिक पत्नी ठेवण्याचा अधिकार होता.