Prince William:ब्रिटनचं राजघराणं आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या घराण्यातील प्रिन्स विल्यम आणि त्याच्या लहान भावाची बायको मेगन मार्कल यांच्यात झालेला वाद एका नव्या पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला आहे. प्रिन्स विल्यमने त्याची पत्नी केट मिडल्टनला प्रपोज करताना आई डायनाची रिंग दिली होती. या दोघांचा शाही विवाह सोहळाही जगाने पाहिला. मात्र याच प्रिन्स विल्यमने प्रिन्स हॅरीची पत्नी मेगनला माझ्या आईचे दागिने घालू नकोस असं कठोर शब्दांत ( Prince William ) बजावलं होतं. एवढंच नाही प्रिन्स हॅरीने मेगनशी लग्न करण्याचा निर्णयही प्रिन्स विल्यमला पसंत नव्हता. त्याने हॅरीला तू मेगन बरोबर असलेलं नातं संपव असा सल्ला दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं हे प्रकरण काय? कुठल्या पुस्तकात दावा?

The Insider ने जे वृत्त यासंदर्भात दिलं आहे त्यानुसार प्रिन्स विल्यमने ( Prince William ) ३९ वर्षीय हॅरीला हे देखील सांगितलं होतं की तू अभिनेत्री असलेल्या मेगनला लग्नाचं वचन देण्याआधी थोडा फेरविचार कर. कारण तू लग्नाचं वचन तिला दिलंस तर तिला राजेशाही थाटात जगायची सवय लागेल. लेखक रॉब जॉब्सन यांनी त्यांच्या ‘कॅथरीन, द प्रिन्सेस ऑफ वेल्स’ या पुस्तकात यांनी हा उल्लेख केला आहे. २०१८ मध्ये हॅरी आणि मेगन यांचा विवाह झाला. त्याआधी हॅरी आणि विल्यम यांच्यात काय चर्चा झाली होती त्याचे तपशील या पुस्तकात देण्यात आले आहेत. हे सगळं घडलं तरीही मेगन आणि हॅरी यांचा विवाह झाला.

मेगनला प्रिन्स विल्यमने काय बजावलं होतं?

प्रिन्स विल्यमने ( Prince William ) मेगनला हे कठोर शब्दांत बजावलं होतं की लग्नात तू माझी आई डायनचे दागिने घालायचे नाहीस. तसंच तिचा कुठलाही ड्रेसही तू घालायचा नाहीस. हा तपशील या पुस्तकात देण्यात आला आहे. या पुस्तकात असाही दावा करण्यात आला आहे की मेगन आणि हॅरी यांच्या लग्नाच्या आधीच प्रिन्स विल्यम ( Prince William ) आणि हॅरी यांच्यातलं भावा भावांचं नातं बिघडलं. मेगनचं राजघराण्यात येणंच प्रिन्स विल्यमला पसंत नव्हतं.

हे पण वाचा- मेगन मार्कलमुळे प्रिन्स हॅरी आणि विल्यम्स यांच्यात हाणामारी; हॅरीच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील ‘तो’ किस्सा

कोण आहे मेगन मार्कल?

ब्रिटनच्या राजघराण्याची सदस्य होण्याआधी मेगन मार्कल ही एक अभिनेत्री होती. २०११ ते २०१८ या कालावधीत मेगनने ‘सूट्स’ मध्ये रेचल जोन ही भूमिका साकारली होती. ‘सूट्स’ हा एक अमेरिकन टीव्ही ड्रामा होता आणि तो सुपरहिट झाला होता. मेगनचा जन्म ४ ऑगस्ट १९८१ ला लॉस एंजल्समध्ये झाला. २००२ मध्ये आलेल्या ‘जनरल हॉस्पिटल’ या चित्रपटातून तिने तिचं फिल्म करिअर सुरू केलं. मेगनने आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि थिएटर या विषयांमध्ये शिक्षण घेतलं आहे. अर्जेंटीनाच्या अमेरिकी दुतावासात तिने इंटर्नशिपही केली. सिनेमात काम करण्याआधी ती फ्रिलान्स कॅलिग्राफीही करत होती. हॅरी आणि मेगन मार्कल या दोघांचं लग्न राजघराण्याला पटलेलं नाही. राजघराण्यात मारले जाणारे टोमणे, दिली जाणारी दुषणं यामुळे त्यांनी राजघराणं सोडलं आणि कॅलिफोर्नियात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला.

प्रिन्स विल्यमला हॅरी आणि मेगन यांचं नातं मुळीच पसंत नव्हतं. त्यामुळे प्रिन्स विल्यमने हॅरीला तू मेगनसह असलेलं नातं संपव असं सांगितलं होतं.

हॅरी आणि मेगन यांचं नातंच विल्यमला मान्य नव्हतं

आता मेगनला प्रिन्स विल्यमने ( Prince William ) नेमकं काय बजावलं होतं त्याचे संदर्भ या नव्या पुस्तकामुळे समोर आले आहेत. हॅरी जेव्हा मेगनला भेटायला घेऊन आला तेव्हाही काहीसं विचित्र वातावरण निर्माण झालं होतं. लेखक रॉब जॉब्सन यांनी पुस्तकात हे देखील म्हटलं आहे की हॅरीने प्रिन्स विल्यमची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता, तसंच मेगन हळूहळू राजघराण्यात रुळेल, आपण तिला थोडा वेळ देऊ असंही तो म्हणाला होता. मात्र प्रिन्स विल्यमने भाऊ हॅरीला तिच्याबरोबर असलेलं नातं संपवण्याचा निर्णय घे असं सांगितलं होतं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prince william banned meghan markle from wearing princess diana jewellery reveals new book scj