ब्रिटनचे राजपुत्र विल्यम यांची पत्नी प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. त्यांनी शुक्रवारी (२२ मार्च रोजी) यासंदर्भातील माहिती एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली. त्यांच्यावर केमोथेरपी सुरू आहे. जानेवारी २०२४ मध्ये त्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया झाली होती, त्यावेळी त्या दोन आठवडे रुग्णालयात होत्या. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर कमी झाला होता, आता त्यांनी कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं आहे.
केट यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं की त्यांना कर्करोग झाला आहे. मात्र, कोणता कर्करोग आहे आणि तो कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती त्यांनी दिलेली नाही. “काही चाचण्या झाल्या. त्यानंतर मला कर्करोग झाल्याचं निदान झालं. माझ्यासाठी आणि विल्यमसाठी ही धक्कादायक बातमी होती. आता मी ठीक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केमोथेरपी घेत आहे,” असं त्या व्हिडीओमध्ये म्हणाल्या.
केट यांना कोणत्या प्रकारचा कर्करोग झाला आहे, याची माहिती देऊ शकत नाही. त्यांना वैद्यकीय गोपनीयतेचा अधिकार आहे, असं केन्सिंग्टन पॅलेसच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. दरम्यान, कर्करोगाचे निदान झालेल्या केट या राजघराण्यातील तिसऱ्या सदस्य आहेत. याआधी किंग चार्ल्स आणि डचेस ऑफ यॉर्क सारा फर्ग्युसन यांनाही कर्करोगाचं निदान झालं होतं.