देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत आपल्या महाआघाडीला बेंगळूरूमध्ये झालेल्या बैठकीत ‘इंडियन नॅशनल डेव्हल्पमेंटल इनक्लुजिव्ह अलायन्स’ म्हणजेच ‘इंडिया’ असे नाव दिले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सडकून टीका केली. तसेच ईस्ट इंडिया कंपनीपासून दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीन यांच्या नावाचा उल्लेख करत ‘इंडिया’ नावावर टीका केली. याला आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. ते बुधवारी (२६ जुलै) मुंबईत विधीमंडळाबाहेर बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया नावावर चर्चा करणं हास्यास्पद आहे. ही विचारांची लढाई आहे आणि आम्हाला मोदींचा विचार घालवायचा आहे. आयआयटी, आयआयएम, एम्सच्या नावात इंडिया आहे. ही नावं मोदी बदलणार आहेत का? विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. मणिपूरवर बोलायची पंतप्रधान मोदींची हिंमत नाही.”

“हे अतिशय बालिशपणाचं उत्तर आहे”

“दुसरीकडे मोदी नावाबद्दल, फोटोबद्दल, चित्राबद्दल बोलत आहेत. हे अतिशय बालिशपणाचं उत्तर आहे. आम्ही इंडिया आहोत आणि आम्हाला इंडिया असल्याचा, भारत असल्याचा अभिमान आहे. त्यामुळे मोदींनी नावावरून काहीही कुरापत काढली, तरी त्याचा उपयोग होणार नाही,” असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

भाजपेतर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ नावाच्या महाआघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जोरदार हल्लाबोल केला. ब्रिटिशांची राजवट लादणारी ‘ईस्ट इंडिया कंपनी’, दहशतवादी संघटना ‘इंडियन मुजाहिद्दीन’, बंदी घातलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, अगदी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ या नावांमध्ये ‘इंडिया’ शब्द वापरला आहे. केवळ नाव घेऊन यश मिळत नसते, अशा शब्दांत भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी शरसंधान केले. तर हा मणिपूरवरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

हेही वाचा : मोदी यांचा इंडियावर हल्लाबोल

‘इंडियन मुजाहिद्दीनच आठवली का?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ इंडियन मुजाहिद्दीन, पीएफआय यांचीच आठवण झाली का, असा सवाल राष्ट्रीय जनता दलाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर विचारण्यात आला आहे. इस्रो, एम्स, आयआयटी, आयआयएम, आयआयएससी, एनपीसीआयएल, आयएएस, आयपीएस, आयएफएस, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, आयटीबीपी.. एवढेच नव्हे, तर तुमचे स्वत:चे पद आठवले नाही. तुमचे मन काय विचार करू शकते, हे दिसून येते, अशा शब्दांत राजदने पंतप्रधानांच्या विधानावर तोफ डागली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan criticize pm narendra modi over manipur india opposition front name pbs